डोकलाम वाद आता कुठे शमला असताना चीनच्या सैनिकांनी पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केल्याची माहिती आहे. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या काही सैनिकांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती, पण भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना विरोध केल्यानंतर चिनी सैनिक त्यांच्या हद्दीत परतले.


वास्तविक नियंत्रण रेषा (LAC) वरील अरुणाचल सेक्टरमध्ये चीनच्या सैनिकांनी ही घुसखोरी केली. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार 10 दिवसांपूर्वी ही घटना घडली. ‘तुम्ही भारताच्या हद्दीत आला आहात’, असे भारतीय जवानांनी चीनी सैनिकांना सांगितल्यानंतर ते त्यांच्या हद्दीत परतल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. याशिवाय आयटीबीपीच्या अहवालानुसार, चीनचे दोन हेलिकॉप्टर्सही भारताच्या हद्दीत आले होते. 27 ऑग्सट रोजी सकाळी जवळपास नऊ वाजण्याच्या सुमारास हे हेलिकॉप्टर लदाखमध्ये पाहण्यात आले. जवळपास पाच मिनिट हे दोन्ही हेलिकॉप्टर भारतीय हवाई हद्दीत घिरट्या घालत होते असं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे.

गेल्या वर्षी डोकलाम वादानंतर चीन आणि भारताचे बिघडलेले संबंध आता कुठे सुरळीत होताना दिसत होते. मात्र, पुन्हा चीनकडून घुसखोरीची घटना झाल्याने दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे.