अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा करोना व्हायरसवरुन चीनला लक्ष केलं आहे. करोना व्हायरस हा चीनी व्हायरस आहे आणि तो वुहानच्या प्रयोगशाळेतून आल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे. अमेरिकेचे आणि जगाचे जे नुकसान झालं आहे ते भरुन काढण्यासाठी चीनने १० ट्रिलियन अमेरिकन डॉलर (१० लाख कोटी डॉलर) द्यायला हवेत असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हाइट हाउसचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांचे काही ईमेल्स बाहेर पडल्यानंतर हे प्रकरण पुन्हा तापलं आहे.
डॉ. अँथनी फौची यांच्या काही ईमेल्समधून करोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळामध्ये डॉ. फौची हे चिनी वैज्ञानिकांच्या संपर्कामध्ये होते असे दिसून येत आहे. डॉ. फौची डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळापासून आतापर्यंत अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे प्रमुख आरोग्य सल्लागार होते. ईमेलमधून समोर आलेल्या माहितीमधून डॉ. फौची चीनच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टने ८६६ पानांचा मजकूर असाणारा ईमेल संवाद समोर आणला होता. यामध्ये चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रव्हेंशनचे निर्देशक जॉर्ज गाओ यांनी डॉ. फौची यांना पाठवला होता. या ईमेलमध्ये गाओ यांनी अमेरिकेतील लोकांना मास्क घालण्यावरुन केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. अमेरिकेमध्ये मास्क न घालण्यासंदर्भात दिलेली सूट ही मोठी चूक असल्याची टीका गाओ यांनी केली होती. त्यावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आता प्रत्येक जण अगदी माझे शत्रू देखील हेच म्हणत आहेत की वुहानमधील लॅबमधून आलेल्या चिनी व्हायरसबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बरोबर होते,” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी करोना व्हायरस प्रयोगशाळेतून बाहेर आल्यामुळे लोकांचे प्राण गेले आणि जगाचे जे नुकसान झालं आहे त्यासाठी चीनकडून दंड वसूल करावा असे म्हटले आहे.
करोना विषाणूची निर्मिती चीनच्या वुहान लॅबमध्येच!; वैज्ञानिकांना मिळाले पुरावे
मात्र डॉ. फौची यांनी हा दावा फेटाळला आहे. वुहानच्या प्रयोगशाळेपासून जगामध्ये करोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नगण्य आहे असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालातही वुहानच्या प्रयोगशाळेतून व्हायरस बाहेर आला होता अशी माहिती असल्याचे ट्रम्प यांनी यापूर्वीदेखील सांगितले होते.
समजून घ्या : करोना विषाणूची उत्पत्ती नक्की कुठे झाली?
या अहवालानुसार, चीनने कोविडच्या विषाणूची माहिती सर्वांना देण्याआधी काही आठवडे आधी नोव्हेंबर २०१९ मध्ये वुहान बायोलॉजी प्रयोगशाळेतील तीन संशोधकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी फॉक्स नेशनच्या कार्यक्रमामध्ये याबद्दल भाष्य केलं होतं. ट्रम्प यांनी राष्ट्रपती पदाच्या काळात हा चिनी व्हायरस असल्याचे अनेकदा म्हटलं होतं.