संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दणदणीत विजय मिळवला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा सत्ताधारी आघाडीने चांगली कामगिरी करीत २४३ पैकी २०० हून अधिक जिंकून जोरदार मुसंडी मारली. दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला मोठा फटका बसला. राज्यात सत्ताविरोधी लाट असूनही विरोधकांना पन्नाशीचा आकडाही गाठता आला नाही. दरम्यान चिराग पासवान यांच्या लोजपालाही चांगलं यश मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विकासाचं धोरण आणि नितीश कुमार यांच्या विकासाच्या धोरणाला मतदान केलं असं म्हटलं आहे.

चिराग पासवान यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

मला हे कायमच वाटत आलं आहे की एकजूट, विनम्रता, मेहनत सगळ्या गोष्टींचं फळ तुम्हाला मिळतं. महाआघाडीला अहंकार होता. २०२० मध्ये मी निवडणूक लढलो तेव्हा मी जदयूचं नुकसान केलं असेही आरोप त्यांनी केले. मग मी फायदा कुणाला पोहचवला? तर त्यावेळी राजदला फायदा झाला होता. बिहारच्या जनतेने त्यांना निवडलं होतं. मात्र मी त्यावेळीही म्हटलं होतं की एनडीए एकत्र लढली असती तर राजदला त्यावेळी २५ जागाही जिंकता आल्या नसत्या. महाआघाडी अहंकारात होती. १८ तारखेला आमचा शपथविधी होईल असंही सांगितलं गेलं. एकीकडे एनडीए पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासावर, नितीश कुमार यांच्या धोरणांवर, बिहार फर्स्टच्या गोष्टी आम्ही करत होतो. दुसरीकडे विरोधकांची अहंकारी आघाडी त्यांच्या घटक पक्षांनाही सन्मान देत नव्हतं. मुख्यमंत्री कोण होणार ते जाहीर केलं. उपमुख्यमंत्री पदावरुन लाथाळ्याही झाल्या. जनतेने या गोष्टी स्वीकारल्या नाहीत. ज्यामुळे ते हरले आहेत असं चिराग पासवान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या राजकारणावर बिहारच्या जनतेने विश्वास ठेवला-चिराग पासवान

चिराग पासवान पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावर लोकांनी विश्वास ठेवला. विकासाचं राजकारण पाहिलं.मागील ११ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनकल्याणाच्या योजना आणल्या आहेत. जात-पात-धर्म विसरुन मदत करण्यात आली. २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारला आले होते. त्यांनी लाखो कोट्यवधी रुपयांचं पॅकेज बिहारसाठी जाहीर केलं. नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विकासाचं राजकारण जनतेने पाहिलं. या सगळ्यामुळे आम्ही यशस्वी झालो असं माझं ठाम मत आहे असं चिराग पासवान यांनी आज तकशी बोलताना सांगितलं.

चिराग पासवान यांचे भाजपा अन् मोदींवरील प्रेम

युतीमध्ये असो वा नसो, चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावरील आपले प्रेम सतत व्यक्त केले आहे. २०२० मध्ये त्यांचा वाद नितीश कुमार यांच्याशी होता, असे त्यांनी सांगितले होते. जेडीयूनेही २०२० मध्ये त्यांचा स्ट्राइक रेट खराब होण्याचे एक प्रमुख कारण चिराग पासवान असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून आतापर्यंत, त्यांचे दिवंगत वडील राम विलास पासवान यांनी स्थापन केलेल्या एलजेपीमध्ये फूट पडली आणि त्यांचे काका पशुपती नाथ पारस मोदींबरोबर गेले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत परिस्थिती बदलली. चिराग पुन्हा भाजपाप्रणित एनडीएच्या गटात परतले, लोकसभेची जागा जिंकली आणि मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात मंत्री झाले.