Class 9 student shoots shoots teacher over slap : उत्तराखंडच्या काशीपूर येथे एका ९वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकावर शाळेत गोळीबर केल्याची घटना घडली आहे. या घटनेत खाजगी शाळेतील शिक्षक गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हा मुलगा त्याच्या जेवणाच्या डब्यात घालून बंदूक शाळेत घेऊन आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
कुंदेश्वरी रोडवरील श्री गुरूनानक सिनीयर सेकंडरी स्कूलमध्ये बुधवारी सकाळी ही घटना घडली. फिजिक्सचे शिक्षक गंगादीप सिंह कोहली हे त्यांचा वर्ग संपवून बाहेर पडत होते. त्याच वेळी अचानक एका विद्यार्थ्याने देशी बनावटीची बंदूक त्याच्या जेवणाच्या डब्यातून खाढली आणि पाठीमागून गोळीबार केला. ही गोळी शिक्षकाच्या उजव्या खांद्याच्या खाली लागली.
यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या विद्यार्थ्याला शाळेतील इतर कर्मचाऱ्यांनी या पकडले. तसेच जखमी झालेल्या शिक्षकाला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करम्यात आले, सध्या हे शिक्षक आयसीयूमध्ये आहेत.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी वर्गात एका प्रश्नाचे उत्तर देऊ न शकल्याने शिक्षकाने कानशिलात लगावल्याचा आणि ओरडल्याचा राग विद्यार्थ्याच्या मानात होता. बुधवारी तो दुपारच्या जेवणाच्या डब्ब्यात लपवलेली बंदूक घेऊन शाळेत घेऊन आला. या विद्यार्थ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
दरम्यान शाळेत झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. या प्रकाराच्या विरोधात उधम सिंग नगर इंडिपेंडन्ट स्कूल असोसिएशनने जिल्ह्यातील सर्व सीबीएसई आणि मान्यताप्राप्त खाजगी शाळा गुरूवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शिक्षक देखील काळा दिवस पाळतील असे सांगण्यात आले. तसेच त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी काशीपूर येथे मूक मोर्चा देखील काढला. दरम्यान यावेळी संघटनेच्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला, तसेच हे सुरक्षा व्यवस्थेतील मोठी त्रुटी असल्याचेही ते म्हणाले.