चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता या विधानसभांमध्ये गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे आमदार किती आणि कोणाचे काय शिक्षण झाले आहे याची माहिती स्पष्ट झाली आहे. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या आमदारांचा सर्वाधिक भरणा दिल्ली विधानसभेत आहे तर छत्तीसगढ स्वच्छ चारित्र्याची विधानसभा म्हणून गणली जाणार आहे. मध्य प्रदेश विधानसभा सुशिक्षित उमेदवारांच्या संख्येत अग्रेसर आहे तर दिल्ली विधानसभेत सुशिक्षित उमेदवारांची संख्या तुलनेने कमी आहे.
दरम्यान, दिल्ली ही सर्वात तरुण विधानसभा ठरली आहे. दिल्ली विधानसभेत ३६ उमेदवार पदवीधारक आहेत, तर १३ जण पदव्युत्तरधारक पदवीधारक आहेत. चारही राज्यांचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उच्चशिक्षित आहेत. दिल्लीत प्रस्थापितांना धक्का देणाऱ्या आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल भारतीय महसूल सेवेचे माजी अधिकारी आणि आयआयटी पदवीधारक आहेत. तर छत्तीसगढचे रमणसिंह डॉक्टरी व्यवसायातून राजकारणात आलेले आहेत. दिल्लीचे भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार हर्षवर्धन हे कान-नाक-घसा तज्ज्ञ आहेत तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान पदव्युत्तर पदवीधारक आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार वसुंधरा राजे पदवीधारक आहेत.
* दिल्ली ७० पैकी २५ आमदार गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे तर निम्मेच उमेदवार पदवीधारक
* राजस्थान २०० पैकी ३६ जण गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे तर ६३ टक्के आमदार पदवीधारक
* मध्य प्रदेश २३० पैकी ७२ आमदार गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे तर ६७ टक्के उमेदवार पदवीधारक
* छत्तीसगढ ९० पैकी १५ उमेदवार गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे तर ५९ टक्के आमदार पदवीधारक