ताजमहाल म्हणजे जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक वास्तू. ही वास्तू प्रेमाचं प्रतीक मानली जाते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून याच ताजमहालात दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं आहे. कारण इथल्या सफाई कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे ताजमहाल आणि परिसरात घाण आणि कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. वेळेवर वेतन न मिळाल्याने इथल्या सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं आहे.
ताजमहालासारख्या ऐतिहासिक ठेवा असलेल्या वास्तूच्या सफाई कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसेल तर हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. ताजमहालाला दररोज देश विदेशातील पर्यटक रोज भेट देत असतात. अशावेळी अस्वच्छता आणि घाणीचं, दुर्गंधीचं साम्राज्य पाहून हे पर्यटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाबाबत काय विचार करतील? असा प्रश्न टुरिस्ट गाईड वेद गौतमने उपस्थित केला आहे. बुधवार आणि गुरूवार या दोन दिवशी भारतीय विकास ग्रुपचे २८ कंत्राटी कर्मचारी संपावर गेले. आम्हाला मागच्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने आम्ही हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्यापैकी एका कर्मचाऱ्याच्या पत्नीवर उपचार सुरू होते. मात्र रूग्णालयात भरण्यासाठी पैसे नसल्याने तिचा उपचाराअभावी मृत्यू झाला. या घटनेनंतर आमच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे त्याचमुळे आम्ही संपावर जात आहोत असे या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. या संपामुळे ताजमहाल परिसरात कचरा, घाण आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं आहे. या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांमधूनही वास येऊ लागला आहे. या प्रकरणी आता भारतीय पुरातत्त्व विभागाने आग्रा महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत मागितली आहे. ताजमहाल प्रत्येक शुक्रवारी बंद ठेवण्यात येतो. भारतीय विकास ग्रुपच्या २८ कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने त्यांनी संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागतो आहोत मात्र ते आम्हाला देण्यात आलेले नाहीत असे या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
दरम्यान ताजमहाल परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरल्याने पर्यटन क्षेत्रातल्या लोकांनीही चिंता व्यक्त केली आहे. स्वच्छतेसारख्या मुलभूत सेवेची व्यवस्थाही केली जात नाही याबाबत पर्यटन उद्योगाचे नेते सुरेंद्र शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.