नवी दिल्ली : मराठी की हिंदी असा वाद होऊच शकत नाही. मराठी असेलच, मराठीला अन्य भाषा पर्याय नाहीत. पण, मराठीबरोबरच इतर भाषाही आल्या पाहिजेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले. भाषा हे संवादाचे माध्यम आहे, वादाचे नाही, असे सांगत त्यांनी त्रिभाषा सूत्राच्या विरोधकांना चिमटेही काढले.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ‘छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्र’ व ‘कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र’ यांचे उद्घाटन गुरुवारी फडणवीस यांच्या उपस्थित झाले. तमीळ समृद्ध प्राचीन भाषा आहे. तिथल्या चोला साम्राज्याने १ हजार वर्षे तमीळ संस्कृती जपली आणि विकसित केली. मग, तामीळ भाषेचा आपल्याला अभिमान का असू नये, असा सवाल फडणवीस यांनी केला. पानिपतची लढाई मराठ्यांनी स्वतःसाठी नव्हे तर, देशाला वाचवण्यासाठी लढली.
छत्रपती शिवाजाी महाराजांनी मराठी माणसाला संकुचित विचार करायला शिकवलेले नाही. ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितले ते विश्वासाठी. देशासाठी लढणारा मराठी माणूस संकुचित असू शकत नाही. ज्या राजधानीला वाचवण्यासाठी मराठ्यांनी बलिदान दिले, त्या दिल्लीमध्ये कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र सुरू झाले ही आनंदाची बाब आहे, असे फडणवीस म्हणाले. मराठी भाषेने देशाला समृद्ध केले आहे. मराठीमध्ये साहित्य, नाटक अशा विविध कला सर्वोत्तम आहेत. देशात थिएटर कुठे टिकले तर मराठीमध्ये… या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे मराठी भाषेवर देशातील सर्व विद्यापाठांमध्ये संशोधन झाले पाहिजे, अशी सूचना फडणवीस यांनी केली.
‘पण, बोलणार नाही…’
दोन्ही अध्यासनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू असताना कन्व्हेन्शन हॉलच्या बाहेर जेएनयूतील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निदर्शने केली. राज्यात नुकत्याच लागू झालेल्या जनसुरक्षा कायदा, भाषिकवाद, प्रादेशिक सत्तावाद आदींविरोधात त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनावर ‘जेएनयू’च्या कुलुगुरू शांतिश्री पंडित यांनी, कुसुमाग्रजांच्याच शब्दांत ‘काही बोलायचे आहे पण, बोलणार नाही’, अशी मार्मिक टिप्पणी केली. हा धागा पकडून फडणवीस यांनीही, हा देश शिवरायांच्या नावे ओळखला जातो. ते देशाचे दैवत आहे. शिवराय हे रयतेचे राजे होते. त्यांचे राज्य लोकशाहीचे प्रतीक होते, असे मत मांडले.
कुसुमाग्रज अध्यासनासाठी तीन कोटी!
जेएनयूमध्ये तब्बल १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कुसुमाग्रज अध्यासन केंद्र सुरू होत आहे. २००८मध्ये या अध्यासनासाठी राज्य सरकारने जेएनयूला दीड कोटी दिले होते, त्याचे आता २ कोटी २६ लाख रुपये झाले आहेत. याव्यतिरिक्त राज्य सरकार या अध्यासनासाठी आणखी ३ कोटी रुपये देणार आहे. हा निधी तातडीने विद्यापीठाला दिला जाईल, अशी माहिती मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. यंदापासून कुसुमाग्रज अध्यासनामध्ये संशोधनाचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन कुलगुरू पंडित यांनी दिले. या समारंभामध्ये तंजावरच्या राजघराण्याचे वंशज बाबाजीराजे भोसले उपस्थित होते.
विद्यापीठात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा
‘जेएनयू’ परिसरात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा केला जाणार असून त्यासाठी जागा देण्याची विनंती राज्य सरकारच्या वतीने विद्यापीठाला करण्यात आली आहे. पुतळा उभारण्यासाठी आवश्यक निधी राज्य सरकारकडून दिला जाईल, असे सामंत यांनी सांगितले. हा पुतळा तरुणांना देशासाठी बलिदान देण्याची स्फूर्ती देईल, असे फडणवीस म्हणाले.
मातृभाषा म्हणून मराठीचा रास्त अभिमान असलाच पाहिजे. मराठीचा आग्रह धरणेही गैर नाही पण, इतर भाषांबद्दल तिरस्कार करायचा आणि इंग्रजीसाठी पायघड्या घालायच्या, हे पाहून मला दुःख होते. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मराठी प्राध्यापकांना डावलले?
अध्यासन केंद्रांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी ‘जेएनयू’ने १० प्राध्यापकांची आयोजन समिती नियुक्त केली होती. मात्र, प्रा. अरविंद येलरी यांचा अपवाद वगळता समितीमध्ये एकाही मराठी प्राध्यापकाचा समावेश करण्यात आला नव्हता. या आयोजन समितीमध्ये ‘जेएनयू’मधील मराठी प्राध्यापकांना डावलल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.