आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असलेले भाजपाचे खासदार साक्षी महाराज आता पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. साक्षी महाराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत त्या राक्षस हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील आहेत, असे म्हटले आहे. ‘जय श्री राम’चा नारा दिल्यावर त्या तुरूंगात पाठवायची भाषा करतात. असे तर राक्षस हिरण्यकश्यपू करायचा असेही ते म्हणाले.
‘जय श्री राम’ असे म्हटल्यानंतर राक्षस राज हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाला तुरूंगात टाकत अनेक यातना दिल्या होत्या. पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी असेच करत आहेत. पश्चिम बंगालचे नाव ऐकल्यानंतर आपल्याला त्रेता युगाची आठवत होत आहे. ‘जय श्री राम’ असे म्हटल्यावर त्या लोकांना तुरूंगात टाकत आहेत. त्या हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील तर नाहीत ना? असा सवाल साक्षी महाराज यांनी केला.
बंगालची जनता त्रस्त झाली आहे आणि याची किंमत ममता बॅनर्जींना चुकवावी लागेल. त्यांचे फुटीरतावाद्यांचे सरकार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सरकार स्थापन होईल. त्यांची हुकुमशाही चालणार नाही, असेही साक्षी महाराज यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर काही लोकांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर काही लोकांना अटकही करण्यात आली होती.
दरम्यान, ‘जय श्री राम’ असे लिहिलेले 10 लाख पोस्ट कार्ड ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी पाठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पश्चिम बंगालचे खासदार अर्जुन सिंह यांनी दिली. यापूर्वी काही लोकांनी ममता बॅनर्जींसमोर ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर त्या चिडल्या होत्या. तसेच घोषणा देणाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्या होत्या. तसेच भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनीही तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांसमोर ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला होता.