डॉलरच्या तुलनेमध्ये घसरत असलेल्या रुपयाचा परिणाम इंधनाच्या दरावर होऊ लागला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होत असतानाच आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घरगुती वापरासाठी असलेल्या पीएनजी गॅसची किंमत ऑक्टोबर महिन्यात ठरविण्यात येणार आहे.

देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या गॅसच्या मूळ दरामध्ये प्रतियुनिट १४ टक्के म्हणजे ३.५ डॉलरने (जवळपास २५२ रुपये) वाढ होण्याचा अंदाज आहे. मार्च २०१६ मध्ये गॅसच्या किमतीमध्ये सर्वाधिक ३.८२ डॉलरने वाढ झाली होती.

नैसर्गिक वायुची किंमत अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि रशियातील सरासरी दराच्या आधारे दर सहा महिन्यांनी ठरविण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून रुपयाची किंमत घसरली आहे त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

पेट्रोल – डिझेलची पुन्हा दरवाढ

मुंबई/नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असून शुक्रवारी मुंबईत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १५ पैशांनी, तर दिल्लीत प्रतिलिटर १० पैशांनी वाढ झाली आहे. मात्र डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली नाही. मुंबईत आता पेट्रोलचा प्रतिलिटरचा दर ८९.६९ रुपये असा झाला आहे, तर दिल्लीत पेट्रोलचा प्रतिलिटरचा दर ८२.३२ रुपये झाला आहे.