भारतीय रेल्वेतून प्रवास करताना आता रेल्वे स्थानकांवर शीतपेये मिळणार नाही. पश्चिम मध्य रेल्वेच्या स्थानकांवर पेप्सी आणि कोकाकोलाची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. पश्चिम मध्य रेल्वेच्या अधिकार क्षेत्रात ३०० स्थानके येतात. रेल्वे स्थानकांवर शीतपेये विकण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र असे कोणतेही प्रमाणपत्र घेण्यात आलेले नाही. त्यामुळे पश्चिम मध्य रेल्वेच्या ३०० स्थानकांवर आता शीतपेयांची विक्री केली जाणार नाही.

‘जोपर्यंत शीतपेये विक्रेत्या कंपन्यांना आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत रेल्वे स्थानकांवर शीतपेयांची विक्री करता येणार नाही,’ अशी माहिती पश्चिम रेल्वेचे सहाय्यक व्यवस्थापक सचिन शुक्ला यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी लोकसभेत शीतपेयांमध्ये कॅडमियम आणि क्रोमियम असल्याचे सांगितले होते. यानंतर आरोग्य विभागाच्या प्रमाणपत्राशिवाय रेल्वे स्थानकांवर शीतपेये विकण्यावर बंदी घालण्यात आली होती.

‘शीतपेये विक्रेत्या कंपन्यांच्या जुन्या प्रमाणपत्रांची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे त्यांना नव्या प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे. जोपर्यंत त्यांना परवानगी मिळत नाही, तोपर्यंत रेल्वे स्थानकांवर शीतपेयांची विक्री करण्यास बंदी असेल,’ असे सचिन शुक्ला यांनी सांगितले आहे. शीतपेयांमध्ये मिसळल्या जाणाऱ्या सर्व पदार्थांची आरोग्य विभागाकडून तपासणी केली जाते, अशी माहिती शुक्ला यांनी दिली आहे. रेल्वे स्थानकांवर विक्रीसाठी बंदी घालण्यात आलेल्या शीतपेयांमध्ये पेप्सी, कोकाकोला, स्प्राईट, सेव्हन अप आणि माऊंटेन ड्यूचा समावेश आहे. या शीतपेयांची विक्री रोखण्यासाठी पश्चिम मध्य रेल्वेकडून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

रेल्वे स्थानकांवर शीतपेये विकण्यास बंदी घालण्यात आल्यानंतर पुरवठादारांना शीतपेयांचा साठा परत घेऊन जाण्यास सांगण्यात आले आहे. पश्चिम मध्य रेल्वेच्या अखत्यारित भोपाळ, जबलपूर आणि कोटा विभागांचा समावेश होतो. शीतपेय बंदीचा आदेश रेल्वेच्या कँटिन आणि स्टॉलला लागू असणार आहे. रेल्वेच्या आत केल्या जाणाऱ्या विक्रीला हा आदेश लागू असणार नाही. ट्रेनमधील पँट्रीकारचे कंत्राट आयआरसीटीसीकडून देण्यात येते. त्यामुळे याबद्दल रेल्वे बोर्ड आणि आयआरसीटीसीकडून निर्णय घेतला जाईल.