सत्तेत असताना सातत्याने हिंदू दहशतवादाचा मुद्दा उचलून धरण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेमुळे भारताचा दहशतवाद विरोधी लढा कमकुवत झाल्याची टीका शुक्रवारी भाजपकडून करण्यात आली. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे त्यावेळी दहशतवादासंदर्भातील अनेक प्रकरणांच्या तपास प्रक्रियेवरही परिणाम झाला. याशिवाय, दहशतवादासारख्या गंभीर समस्येवर भारतीय संसदेत दुफळी माजल्याचे चित्र निर्माण झाल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला.
सध्याच्या घडीला दहशतवाद ही देशासमोरील गंभीर समस्या आहे. संसद आणि संपूर्ण देशात या मुद्द्यावरून दुही असल्याचे चित्र निर्माण होणे योग्य नाही. एकीकडे आपल्या लष्करातील जवान देशाच्या सीमेवर दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात शहिद होत असताना दुसरीकडे संसदेत मात्र, केवळ गोंधळ आणि फाटाफूट पहायला मिळते, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले. दरम्यान, या टीकेनंतर राज्यसभेत विरोधकांनी पुन्हा एकदा गोंधळ घालण्यास सुरूवात केली. मात्र, त्यानंतरही राजनाथ यांनी आक्रमक पवित्रा घेत काँग्रेसवर टीका करणे सुरूच ठेवले.
२०१३ मध्ये काँग्रेसचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी याच सभागृहामध्ये हिंदू दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता. या सगळ्याचा दहशतवादाशी संबंधित सुरू असलेल्या अनेक प्रकरणांच्या चौकशी प्रक्रियेवर परिणाम झाला होता. त्यामुळे भारताचा दहशतवाद विरोधी लढा कमकुवत झाला. गृहमंत्र्यांच्या या अशा भूमिकेमुळे पाकिस्तानामध्ये हाफीज सईदनेही त्यांचे आभार मानले असतील, अशी खोचक टीकाही राजनाथ सिंह यांनी केली. पण आता आमचे सरकार पुन्हा अशी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होऊ देणार नसल्याचे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coining of hindu terror weakened anti terror fight govt
First published on: 31-07-2015 at 04:50 IST