Sarah Skidd Fixes Issues by AI : सध्या जगभर एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) बोलबाला आहे. हे तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर अनेक कंपन्यांना आशा होती की आता त्यांची कर्मचारी संख्या कमी होईल आणि पर्यायाने पैसे वाचतील, अनेक कामं चुटकीसरशी होतील. तसं होत असल्याचं चित्र जगभर दिसू लागलं आहे. या एआयमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी नोकऱ्या देखील गमावल्या आहेत. मात्र, एका बाजूला एआय विविध कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची जागा घेत असतानाच आता एआयने केलेल्या चुका निस्तरण्यासाठी लोकांना पुन्हा कामावर ठेवलं जात आहे. विशेष म्हणजे त्यावर कंपन्या भरमसाठ पैसे देखील खर्च करत आहेत.

एआयने केलेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी अनेक ठिकाणी सॉफ्टवेअर अभियंते व लेखकांना नोकरीवर ठेवल्याच्या घटना समोर येत आहेत. यासंबंधी बीबीसीने एक अहवाल जारी केला आहे. सारा स्किड यांच्याशी संबंधित एका घटनेचं उदाहरणही समोर आलं आहे.

एआयला जमलं नाही ते काम साराने २० तासांत केलं

एआयच्या भरवशावर काम करत असलेली एक कॉन्टेंट एजन्सी अडचणीत सापडली होती. त्यांच्या क्लायंटने दिलेली जबाबदारी कंपनी पार पडू शकली नाही. त्यामुळे या कंपनीने सारा स्किड यांच्याशी संपर्क साधला. कारण, या एजन्सीने त्यांच्या हॉस्पिटॅलिटी क्लायंटसाठी एका जनरेटिव्ह एआय टूलद्वारे वेबसाईट कॉपी लिहून घेतली होती. मात्र ती समाधानकारक नव्हती. तसेच क्लायंटला हे काम लवकरात लवकर पूर्ण करून हवं होतं. त्यामुळे या एजन्सीने सारा यांचं दार ठोठावलं.

याबाबत सारा म्हणाल्या, “एखाद्या एआय कॉपीप्रमाणेच ही कॉपी होती. परंतु, ती आकर्षक नव्हती, क्लायंटचं त्यामुळे समाधान झालं नाही. परिणामी एजन्सीला त्यांचं हे उत्पादन विकता आलं नाही.”

२० तासांचे दोन हजार डॉलर्स घेतले

सारा या ऑरिझोनस्थित उत्पादन विपणन व्यवस्थापक आहेत. ज्या प्रामुख्याने टेक (तंत्रज्ञान) व स्टार्टअप कंपन्यांसाठी लिहितात. त्यांना सदर कॉपी लिहिण्यासाठी २० तास लागले. यासाठी त्यांनी १०० डॉलर्स प्रति तास या दराने २,००० डॉलर्स इतकं वेतन घेतलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…म्हणून सारा यांना एआयची भीती वाटत नाही

एआयमुळे आतापर्यंत हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. प्रामुख्याने कॉन्टेंट क्षेत्रात काम करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. मात्र, सारा यांना एआयची भीती वाटत नाही. कारण त्या म्हणतात, “एआयमुळे मला पैसे कमावण्याच्या, कामाच्या आणखी संधी मिळत आहेत. कदाचित मी भोळी असेन. परंतु, मला वाटतं की तुम्ही तुमच्या क्षेत्रात उत्तम असाल तर तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. किंवा एआय तुमची जागा घेऊ शकणार नाही.” त्या बीबीसीशी बोलत होत्या.