पीटीआय, गुवाहाटी : Rahul Gandhi disqualification issue सुरतच्या न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्वापासून अपात्र ठरवण्यात मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने बुधवारी आसाम विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडल्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. या गोंधळामुळे अध्यक्ष विश्वजीत दैमारी यांना सभागृह दोन वेळा स्थगित करणे भाग पडले. त्यांनी काँग्रेसचे दोन आमदार व एक अपक्ष आमदार यांना दिवसभरासाठी निलंबित केले.
प्रश्नोत्तराचा तास संपताच दैमारी यांनी विरोधी पक्षनेते देवव्रत सैकिया यांना हा मुद्दा मांडण्याची परवानगी दिली व हा प्रस्ताव ग्राह्य मानला जाऊ शकण्याबाबत बोलण्यास सांगितले. ‘आम्ही हा ठराव देशाच्या राष्ट्रपतींना पाठवून त्यांना घटनेचे संरक्षण करण्याची विनंती करू इच्छितो. घटना सर्वासाठी समान असून, तिचे संरक्षण करण्यासाठी कार्यपालिकेने निष्पक्षपणे काम करायला हवे’, असे सैकिया म्हणाले. खासदाराच्या अपात्रतेच्या संबंधात घटनेच्या निरनिराळय़ा कलमांचा उल्लेख करून, राहुल गांधी यांच्या अपात्रतेमुळे घटनेचे उल्लंघन झाले असल्याचा दावा त्यांनी केला. ‘आपण न्यायिक प्रकरणावर येथे मते व्यक्त करत आहोत. येथे गोंधळ घालण्याचा निर्णय काल रात्री झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला ’, असे मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा म्हणाले.