गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हैदराबाद येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी पाच रुपयांचे तिकीट आकारण्यावरून काँग्रेसने भाजपवर टीकेची राळ उडवली आहे. सभेसाठी पाच रुपये घेऊन भाजपनेच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी खरी किंमत दाखवून दिल्याचा टोला काँग्रेसने मारला. मोदी यांच्या प्रसिद्धीचा फायदा उठवण्यासाठी आंध्र प्रदेशातील भाजप पदाधिकाऱ्यांनी एक नवीन क्लृप्ती शोधली आहे. पक्षाचे राष्ट्रीय निवडणूक प्रचारप्रमुख नेमणूक झालेल्या मोदींची ११ ऑगस्ट रोजी सभा होणार आहे. या सभेसाठी प्रत्येक व्यक्तीमागे पाच रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. या नोंदणी शुल्काद्वारे जमा होणारी रक्कम उत्तराखंडमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
 हैदराबादमधील लाल बहादूर शास्त्री स्टेडियममध्ये होणाऱ्या या जाहीर सभेस १८ ते ४० वयोगटातील सुमारे एक लाख नागरिकांना जमा करण्याचा निर्धार भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यासाठी १० ऑगस्टपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे.
एखाद्या बाबाच्या प्रवचनाला १०० ते १० हजार रुपयांचे तिकीट असते. एखाद्या अयशस्वी चित्रपटाचे तिकीटही २०० ते २५० रुपयांपर्यंत असते. मात्र मुख्यमंत्र्याला ऐकण्यासाठी पाच रुपयांचे तिकीट हे त्या व्यक्तीची बाजारातील खरी किंमत दर्शवीत असल्याचा टोला माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी ट्विटरवरून केली आहे.
काँग्रेस नेते पैसे द्यायला तयार असूनही लोक त्यांना ऐकत नाहीत तर भाजप नेत्यांना ऐकण्यासाठी लोक पैसे द्यायला तयार आहेत आणि यामुळेच मनीष तिवारी यांचा जळफळाट झाल्याची टीका भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केली.
मोदींची वाढती लोकप्रियता
काँग्रेसला पचत नाही- भाजप
नरेंद्र मोदींच्या सभेला पाच रुपये शुल्क आकारण्याच्या मुद्दय़ावरून काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेला भाजपनेही मंगळवारी प्रत्युत्तर दिले. मोदींची वाढती लोकप्रियता त्यांच्या पचनी पडत नसल्याचे भाजपने म्हटले आहे.
मोदींच्या प्रभावामुळे काँग्रेस निराश झाली आहे. त्यांना मोदींची लोकप्रियता पचत नसल्यामुळे त्यांनी हीन टीका सुरू केल्याचे वरिष्ठ भाजप नेते एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलेआहे.  सभेसाठी घेण्यात येणारे शुल्क हे सक्तीचे नाही. ही जमा होणारी रक्कम उत्तराखंडमधील पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. या सरळ गोष्टीला काँग्रेसने आक्षेप घेणे आश्चर्यकारक आहे. मोदींच्या सभेला अयशस्वी ठरवणाऱ्या काँग्रेसने गेली पन्नास वर्षे देशात अपयशी प्रदर्शन केल्याची टीका व्यंकय्या नायडू यांनी केली.
प्रदेश भाजप अध्यक्ष जी किशन रेड्डी म्हणाले की, मोदींच्या सभेसाठी घेण्यात येणारे पाच रुपये शुल्क हे सक्तीचे नाही. ज्यांना ते देता येणे शक्य नाही, त्यांनाही सभेला उपस्थित राहता येणार आहे. सभेसाठी कोणत्याही प्रकारचे तिकीट नसून तशी तिकिटे छापलेलीच नसल्याचे त्यांनी सांगितले.