नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी तीव्र टीका केली. मृत शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध नसल्याचा दावा पूर्ण चुकीचा असून केंद्र  सरकार असत्य बोलत आहे. केंद्र सरकारकडे मृत शेतकऱ्यांची आकडेवारी नसेल तर आम्ही केंद्राला देऊ, असेही राहुल म्हणाले.

पंजाबमध्ये ४०३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून त्याची आकडेवारी पंजाबमधील काँग्रेस सरकारकडे आहे. त्या आधारावर या शेतकरी कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची भरपाईही देण्यात आली आहे. याशिवाय पंजाब सरकारने १५२ कुटुंब सदस्यांना नोकरीही दिली असल्याची माहिती राहुल यांनी पत्रकार परिषदेत दिली. अन्य राज्यांतील किमान १०० शेतकऱ्यांच्या मृत्यूची यादीही काँग्रेसकडे उपलब्ध आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान ७००हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ५०० शेतकऱ्यांची यादी आम्ही देत आहोत. उर्वरित आकडेवारी सार्वजनिकरीत्या उपलब्ध असून या कुटुंबीयांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी केंद्र सरकारला संपर्क साधता येऊ शकतो, अशी सूचना राहुल गांधी यांनी केली.

शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकार भरपाई देणार आहे का, असा प्रश्न लोकसभेत विचारण्यात आला होता. त्यावर आंदोलनादरम्यान झालेल्या मृत्यूंची आकडेवारी केंद्र सरकारकडे नसून भरपाई देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तोमर यांनी स्पष्ट केले होते. केंद्र सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वादग्रस्त तीन शेती कायदे मागे घेतले. आता आंदोलनादरम्यान ७००हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे.