केंद्रीय मंत्री चरणदास महंत यांची छत्तीसगड प्रदेश काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
माजी मंत्री भूपेश बघेल यांची प्रदेश काँग्रेसचे कार्यक्रम समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये या वर्षअखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. गेली दहा वर्षे काँग्रेस येथे सत्तेत नाही. त्यामुळे ५८ वर्षीय महंत यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. ते सरचिटणीस दिग्विजय सिंह यांचे समर्थक मानले जातात. २००९च्या लोकसभा निवडणुकीत छत्तीसगडच्या कोरबा मतदारसंघातून ते विजयी झाले. राज्यात काँग्रेसला ही एकमेव जागा मिळाली होती.  नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या काँग्रेस नेत्यांना श्रद्धांजली म्हणून विधानसभा निवडणूक होईपर्यंत प्रदेशाध्यक्षपद रिकामे ठेवावे अशी मागणी अजित जोगी यांनी केली होती. प्रचारात काँग्रेस सुरक्षा व्यवस्थेमधील त्रुटी हा मुद्दा घेऊन भाजप सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होईल, असा विश्वास महंत यांनी रायपूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
राष्ट्रीय तपास संस्थेने नक्षलवादी हल्ल्यामागे कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे, त्याबाबत विचारले असता सावध प्रतिक्रिया दिली. याबाबत तपास संस्था आणि न्यायिक आयोग काम करत आहेत, अहवालाची प्रतीक्षा करू, असे उत्तर दिले. राज्यातील काँग्रेस नेते भाजप विरोधात लढताना एकजूट ठेवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.