पीटीआय, नवी दिल्ली

‘आता ते परत आले आहेत, त्यामुळे त्यांना मणिपूरला भेट देण्यासाठी, पहलगाममधील दहशतवाद्यांना अद्याप शिक्षा का झाली नाही, याचा आढावा घेण्यासाठी आणि त्यांच्या गृहराज्यातील पायाभूत सुविधांच्या कोसळलेल्या स्थितीवर विचार करण्यासाठी वेळ मिळू शकेल’, असा टोला गुरुवारी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. पंतप्रधान संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकही घेऊ शकतात, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी भारतात परतले. या दौऱ्यादरम्यान मोदी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे झालेल्या १७ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेलाही उपस्थित राहिले. पंतप्रधान मोदी भारतात परतल्यानंतर काँग्रेसने गुरुवारी त्यांच्यावर टीका केली.

‘भारत त्यांच्या ‘सुपर प्रीमियम फ्रिक्वेंट फ्लायर पंतप्रधानां’चे स्वागत करतो. ते पुन्हा प्रवास करण्यापूर्वी कदाचित तीन आठवडे देशात राहण्याची अपेक्षा आहे. आता ते देशात आले आहेत, तर त्यांना मणिपूरला भेट देण्यासाठी वेळ मिळू शकेल, तेथील लोक दोन वर्षांहून अधिक काळ त्यांची वाट पाहत आहेत; पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना अद्याप का शिक्षा झाली नाही याचा आढावा त्यांनी घ्यावा; त्यांच्या गृहराज्यातील पायाभूत सुविधा कोसळल्याचाही विचार करावा; आणि पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या हिमाचल प्रदेशला मदत मंजूर करावी,’ असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पंतप्रधान मोठ्या प्रमाणातील व्यापाराला चालना देण्यासाठी ‘जीएसटी’तील सुधारणांवर लक्ष केंद्रित करू शकतात. मोठ्या व्यावसायिक गटांना पसंती देणाऱ्या कंपन्यांव्यतिरिक्त इतर कंपन्यांकडून खासगी गुंतवणूक वाढवण्यासाठीही ते पावले उचलू शकतात, असेही रमेश म्हणाले.