गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या ‘आजारी’ असल्याचा केलेला उल्लेख तसेच उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासंबंधी केलेल्या वादग्रस्त विधानांची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने भाजपची मान्यता रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसने सोमवारी केली. काँग्रेसच्या या मागणीमुळे भाजप विरुद्ध काँग्रेस वादाला आणखी गंभीर वळण लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
मोदी यांनी छत्तीसगढच्या प्रचारसभेत भाषण करताना सोनिया गांधी या आजारी असल्याचा उल्लेख केला होता. तसेच राहुल गांधी यांच्यासंबंधीही वादग्रस्त विधाने केली असल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. मोदी आणि त्यांच्या पक्षाकडून सातत्याने निवडणूक आचारसंहितेचा भंग होत असून आगामी निवडणुका खुल्या आणि निष्पक्ष आणि शांततामय वातावरणात पार पडण्यासाठी भाजपची मान्यता काढून घ्यावी, अशी मागणी काँग्रेसने आयोगाकडे केली आहे.
छत्तीसगढच्या प्रचारसभेत भाषण करताना मोदी यांनी ‘हा पैसा तुम्हाला तुमच्या मामांकडून मिळतो काय, असे मी शहजाद्यांना (राहुल गांधी ) विचारू इच्छितो’, असे वक्तव्य केले होते, तर ‘मॅडम, तुम्ही आजारी असाल, तर तुम्ही तुमच्या पुत्राकडे काम सोपवा’ असे आवाहन मोदी यांनी सोनियांना केले होते, असे काँग्रेसने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress complains to election commission against narendra modi
First published on: 19-11-2013 at 01:35 IST