scorecardresearch

गेहलोत-पायलट वादावर प्रसंगी कठोर निर्णय; काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांचा इशारा

पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रसंगी ‘कठोर निर्णय’ घेण्यास काँग्रेस मागे-पुढे पाहणार नाही.

गेहलोत-पायलट वादावर प्रसंगी कठोर निर्णय; काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांचा इशारा
(संग्रहित छायाचित्र) जयराम रमेश

इंदूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांचा ‘गद्दार’ असा उल्लेख केल्यानंतर राजस्थानमधील या दोन्ही नेत्यांच्या गटांत तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महासचिव आणि संपर्कप्रमुख जयराम रमेश यांनी रविवारी येथे स्पष्ट केले, की राजस्थानमध्ये काँग्रेसचे पक्षसंघटन महत्त्वाचे आहे. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रसंगी ‘कठोर निर्णय’ घेण्यास काँग्रेस मागे-पुढे पाहणार नाही.

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेचा इंदूर येथे सध्या मुक्काम आहे. त्या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना रमेश म्हणाले, की आमच्यासाठी काँग्रेसच्या पक्षसंघटनेस सर्वोच्च महत्त्व आहे. राजस्थानमधील समस्येवर पक्ष संघटना मजबूत होईल, असाच तोडगा आम्ही काढू. त्यासाठी आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागला तर आम्ही प्रसंगी तो घेऊ. या प्रकरणी जर (गेहलोत-पायलट गटांदरम्यान) सर्वसंमतीने तडजोड करता आली तर ती केली जाईल. या वादावर काँग्रेस नेतृत्व योग्य तोडगा काढण्यासंदर्भात विचार करत आहे. मात्र हे कधी होणार, याबाबत कोणतीही कालमर्यादेची मुदत नाही. ही मुदतही काँग्रेसचे नेतृत्वच ठरवेल.

गेहलोत यांनी काही शब्दप्रयोग टाळायला हवे होते

गेहलोत यांनी एका वाहिनीस नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सचिन पायलट यांना ‘गद्दार’ म्हणून संबोधले होते. त्यांनी २०२० मध्ये काँग्रेसविरुद्ध बंड पुकारून आपले सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करता येणार नाही, असेही गेहलोत म्हणाले होते. त्यावर बोलताना रमेश म्हणाले, की राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत काही शब्दप्रयोग करणे टाळायला हवे होते. पण इतर राज्यांप्रमाणेच राजस्थानमध्येही भारत जोडो यात्रेची यशस्वी वाटचाल होईल.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 03:12 IST

संबंधित बातम्या