कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येतेय तसातसा प्रचारही आक्रमक होत चालला आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुमाकुरू येथे जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस गेल्या अनेकवर्षांपासून ‘गरीब, गरीब, गरीब’ करत आहे पण त्यांना गरीबांसाठी काहीही करता आलेले नाही.

काँग्रेस पक्ष भारतातील गरीबांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. आता त्यांनी गरीब बोलणे बंद केले आहे कारण आता लोकांनीच गरीब कुटुंबातून पंतप्रधान निवडला आहे असे मोदी म्हणाले. इंदिरा गांधी यांच्या काळापासून निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने गरीबांना मुर्ख बनवले आहे. काँग्रेस हा खोट बोलणारा पक्ष असून मतांसाठी ते पुन्हा खोट बोलत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांची किंवा गरीबांची कोणाचीही काळजी नाही. लोक आता काँग्रेसला वैतागले आहेत असे मोदी म्हणाले.

कर्नाटकातील जनतेने काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या दोन पक्षांमधली आघाडी समजून घेतली पाहिजे. दोघेही आम्ही परस्परांच्या विरोधात लढत आहोत असे दाखवत आहेत. पण बंगळुरुमध्ये जेडीएसचा काँग्रेसच्या महापौराला पाठिंबा आहे असे मोदी तुमाकुरु येथील सभेत म्हणाले. निवडणुकीची तारीख जशी जवळ येतेय तसा प्रचार अधिक धारदार होत चालला असून भाजपा आणि काँग्रेस दोघांमध्येही आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे.