Congress leader BK Hariprasad equates RSS with Taliban : स्वतंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कौतुक केले होते. यानंतर काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा ‘भारतीय तालिबान’ असल्याचे म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना माजी राज्यसभा खासदार बी. के. हरिप्रसाद यांनी आरएसएसचे कौतुक केल्याबद्दल पंतप्रधान मोदींवर टीका करताना यासंबंधी विधान केले आहे.

“ते (आरएसएस) देशातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी आरएसएसची तुलना फक्त तालिबानशी करेन. ते भारतीय तालिबान आहेत आणि पंतप्रधान त्यांचे लाल किल्ल्यावरून कौतुक करत आहेत,” असे ते एएनआयशी बोलताना म्हणाले.

हरिप्रसाद यांनी आरएसएसच्या आर्थिक स्थितीवर देखील यावेळी प्रश्न उपस्थित केले. “स्वतंत्र्यलढ्यात सहभागी झाले असे कोणी ‘संघी’ होते का? आरएसएस ही नोंदणीकृत संघटना नाही ही शरमेची बाब आहे. त्यांना निधी कुठून मिळतो याबद्दल आम्हाला माहिती नाही. कोणत्याही एनजीओला देशात काम करतायेच असेल तर त्यांनी संविधानाप्रमाणे नोंदणी केली पाहिजे,” असेही ते म्हणाले.

यावेळी काँग्रेस नेत्याने भारतीय जनता पार्टी आणि आरएसएस हे इतिहासाची मोडतोड करण्यात पटाईत असल्याचा आरोपही केला. हरिप्रसाद यांनी असाही दावा केला की ब्रिटिश राजवटीच्या काळात बंगालचे पंतप्रधान एके फाझलुल हक यांनी फाळणीचा पहिला ठराव मांडला होता आणि जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी देखील त्यामध्ये सहभागी होते.

“बीजेपी आणि आरएसएस हे इतिहासाची मोडतोड करण्यात पटाईत आहेत आणि ते इतिहास पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत. फाझलुल हक आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी बंगालमध्ये फाळणीचा पहिला ठाराव मांडला होता. जिना आणि सावरकर यांचे मत होते की दोम्ही धर्मांना वेगळ्या राज्याची गरज आहे. ते यासाठी काँग्रेसला दोष देण्याचा प्रयत्न करत आहेत, ” असे हरिप्रसाद पुढे बोलताना म्हणाले.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, “येथे गर्वाने सांगू इच्छितो की, १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाली. व्यक्तिनिर्माणापासून राष्ट्रनिर्माणापर्यंत संघाचे मोठे योगदान आहे. लक्षावधी स्वयंसेवकांनी देशासाठी जीवन समर्पित केले. संघ जगातील सर्वांत मोठी ‘एनजीओ’ आहे”, असे म्हणत पंतप्रधानांनी संघकार्याचे कौतुक केले. काँग्रेस, तसेच डाव्या पक्षांनी संघाच्या उल्लेखावरून पंतप्रधानांवर टीका केली आहे. यानंतर बी. के. हरिप्रसाद यांचे हे विधान आले आहे.