केरळच्या दोन मासेमारांना केरळच्या किनाऱ्याजवळ मारुन टाकल्याच्या प्रकरणावर सुरु असलेला खटला बंद करण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. यावरुनच आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. खोटं बोलण्यासाठी मोदींना नोबेल मिळायला हवं, अशी टीका त्यांनी केली आहे.

फेब्रुवारी २०१२मध्ये केरळच्या किनाऱ्याजवळ दोन मासेमारांना मारुन टाकल्याचा आरोप दोन इटालियन खलाशांवर होता. या प्रकरणाची सुनावणीही सुरु होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने भारतातली ही सुनावणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात आता इटलीच्या कायद्यानुसार त्याच देशामध्ये पुढील कारवाई होणारआहे.

आणखी वाचा- “काँग्रेस म्हणजे टायटॅनिकचं जहाज आहे”, भाजपा नेत्याने साधला राहुल- सोनिया गांधींवर निशाणा

पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी यांनी ही कारवाई सौम्यप्रकारे चालली असल्याची टीका करत सोनिया गांधींवर टीका केली होती. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर एनडीए सरकारने मौन बाळगल्याप्रकरणी कांग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.


या निर्णयानंतर नरेंद्र मोदींचं एक जुनं ट्विट व्हायरल होत आहे. त्यावेळी मोदींनी प्रोपगंडा पसरवला असल्याच्या एका युजरच्या ट्विटला उत्तर देत दिग्विजय सिंह म्हणतात, मी याबद्दल सहमत आहे, खोटं बोलण्याच्या बाबतीत मोदींना फक्त नोबेलच मिळणार नाही, तर खोट्या लोकांची जर वर्ल्ड चॅम्पियनशीप असेल तर त्यात मोदींना प्रत्येकवेळी सुवर्णपदक मिळेल. त्यांना हरवणं अशक्य आहे.

फेब्रुवारी २०२१मध्ये भारताने असा आरोप केला होता की इटलीच्या दोन खलाशांनी भारतीय मासेमारांना मारुन टाकलं. या प्रकरणी तत्कालीन काँग्रेस सरकारने या खलाशांना पकडून त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावेळी या प्रकरणावरुन नरेंद्र मोदींनी सोनिया गांधीवर टीका केली होती आणि “मॅडम जर एवढ्याच देशभक्त असतील तर त्यांनी या खलांशांना कोणत्या तुरुंगात डांबलं हेही सांगून टाकावं”, असं ट्विटही केलं होतं.