नवी दिल्ली : तंत्रज्ञानाचा वापर करून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. आपल्या आरोपांना आधार म्हणून त्यांनी संगणकीय सादरीकरण, चित्रफिती आणि प्रत्यक्ष मतदारांच्या साक्षी सादर केल्या. मतदार यादीतील पहिल्या मतदाराच्या नकळत त्याच्या नावाचा वापर करून अन्य मतदार बाद करण्यात आल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.

राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यानुसार, ऑनलाइन सॉफ्टवेअर वापरून मतदार वगळण्याचा गैरप्रकार योगायोगाने उघड झाला. आळंदमध्ये बुथ स्तरावरील महिला निवडणूक अधिकाऱ्याला तिच्या काकांचे नाव मतदार यादीतून वगळल्याचे लक्षात आले. हे नाव त्यांच्या शेजाऱ्याने वगळल्याचे आढळल्यावर या अधिकाऱ्याने शेजाऱ्याला जाब विचारला, पण शेजाऱ्यालाही मतदार यादीतून नाव कसे वगळले गेले हे माहीत नव्हते, असे राहुल म्हणाले.

मतदार वगळण्याची प्रक्रिया केंद्रिभूत असून सॉफ्टवेअर मतदार केंद्रातील पहिल्या मतदाराचे नाव इतर मतदारांचे नाव वगळण्यासाठी वापरले गेले आहे. या पहिल्या मतदाराला अर्जदार केले गेले. त्याच्या नावाचा वापर करून सॉफ्टवेअर स्वयंचलित प्रोग्रॅम चालवतो, त्याद्वारे मतदार वगळण्याचे अर्ज ऑनलाइन भरले जातात. याच पहिल्या मतदाराचे नाव वेगवेगळ्या मोबाइल फोनवरीन ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वापरले जाते. यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला गेलो, असा युक्तिवाद राहुल यांनी केला.

१४ मिनिटांत १२ मतदार बाद

आळंदमध्ये एका व्यक्तीच्या मोबाइलवरून दुसऱ्या व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळल्याचा दावा राहुल गांधींनी केला. या दोन्ही व्यक्तींना पत्रकार परिषदेत समोर आणले गेले. गोदाबाई या मतदाराचे नाव असेच वगळले गेले, त्याची माहिती गोदाबाईंना नव्हती, अशी कबुली देणारी चित्रफीतही पत्रकार परिषदेत दाखवण्यात आली. सूर्यकांत नावाच्या व्यक्तीने १४ मिनिटांमध्ये १२ मतदारांना वगळण्याची प्रक्रिया केली. नागराज या दुसऱ्या व्यक्तीने ३६ सेकंदामध्ये २ अर्ज ऑनलाइन भरून २ मतदारांना यादीतून काढून टाकण्याची प्रक्रिया पूर्ण केली. तीदेखील पहाटे ४ वाजता केली गेली, अशी अनेक मतदारांना वगळणाऱ्यांची माहिती राहुल गांधींनी दिली.

अत्यंत संघटितपणे कृत्य

● मतदारांना यादीतून वगळण्याचे अर्ज कोणीतरी कर्नाटकच्या बाहेर अन्य राज्यांतून मोबाइल सॉफ्टवेअरच्या मदतीने हॅक करून भरले व त्यानंतर मतदारांनी नावे वगळली गेली. हा गैरप्रकार अत्यंत संघटितपणे केला गेला आहे.

● मतदारांनी नावे वगळण्यासाठी अन्य व्यक्तीच्या मोबाइलचा वापर केला गेला असेल तर कुठल्या आयपी अॅड्रेसला वगळण्याचा संदेश दिला गेला, ओटीपी कसा मिळवला गेला, हा ओटीपी काय होता, या सगळ्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटकच्या सीआयडीला दिली पाहिजे. कर्नाटकच्या राज्य निवडणूक आयोगानेही ही माहिती विचारली होती, पण ज्ञानेश कुमार यांच्या आयोगाने ती दिलेली नाही, असा दावा राहुल गांधींनी केला.

केवळ आरोप, पुरावे नाहीच : ठाकूर

राहुल गांधी वारंवार मतचोरीचा आरोप करतात पण, पुरावे देत नाहीत. ते हायड्रोजन बॉम्ब फोडायला आले होते पण, त्यांना फुलबाजी पेटवून वेळ मारून न्यावी लागली, अशी उपहासात्मक टीका भाजपचे नेते व खासदार अनुराग ठाकूर यांनी केली. आळंदमध्ये अनधिकृतपणे मतदारांना वगळण्याच्या प्रकाराची चौकशी केली गेली. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने मोबाइल क्रमांक व आयपी अॅड्रेस दिले होते. त्याबाबत कर्नाटक सीआयडीने काय केले असा प्रश्न ठाकूर यांनी केला.