राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. माझं आडनाव राहुल गांधी आहे राहुल सावरकर नाही. त्यामुळे मी माफी मागणार नाही, गुडघे टेकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या भाषणाला घाबरलेत त्यामुळेच त्यांनी ही कारवाई माझ्याविरोधात केली असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच आपल्याला साथ देणाऱ्या सगळ्या पक्षांचे आभारही मानले आहेत. त्यामुळे आपण जाणून घेऊ त्यांच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे १० मुद्दे.
वाचा ही पण बातमी भाजपा गौतम अदाणींना का वाचवत आहे?, राहुल गांधींनी सांगितलं कारण, म्हणाले…
काय आहेत राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतले मुद्दे
१) देशातल्या लोकशाहीवर रोज आक्रमण होतं आहे, लोकांनी शांत बसून सगळं सहन करावं अशी अपेक्षा सरकारची आहे.
२) गौतम अदाणी यांच्या शेल कंपन्यांना २० हजार कोटी रूपये कुणी दिले? हे पैसे २०० टक्के अदाणी यांचे नाहीत. माझ्यावर कारवाई केली तरी मी प्रश्न विचारत राहणार.
३) मी विदेशातून मदत मागितली असे खोटेनाटे आरोप माझ्यावर करण्यात आले. मोदींच्या मंत्रीमंडळातले मंत्री संसदेत खोटं बोलले. मी त्यांच्या धमक्यांना घाबरणार नाही.
४) गौतम अदाणींना पंतप्रधान नरेंद्र मोदी का वाचवत आहेत? अदाणींच्या विरोधात काहीही कारवाई का होत नाही?
वाचा ही पण बातमी- “माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे; मी माफी मागणार नाही”, राहुल गांधींचं भाजपाला प्रत्युत्तर
माझं नाव राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे
५) माझी खासदारकी रद्द करा, मला तुरुंगात धाडा, मला मी माफी मागणार नाही. मी राहुल गांधी आहे राहुल सावरकर नाही.
६) अदाणींवर केलेले आरोप हे भाजपाच्या लोकांना देशावरचे आरोप आहेत असं वाटतं आहे. अदाणी देश आहेत का?
७) संसदेत अदाणी आणि मोदी यांची दोस्ती कशी आहे हा फोटो मी दाखवला त्यानंतर भाजपाच्या खासदारांनी माझ्या विरोधात गदारोळ घालण्यास सुरूवात केली. मला पुढे बोलूच दिलं नाही. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून अदाणी आणि मोदी यांचे सलोख्याचे संबंध आहेत.
८) माझ्या विरोधात कितीही कारवाया केल्या तरीही मी गप्प बसणार नाही, मी प्रश्न विचारतच राहणार आहे.
९) माझी खासदारकी रद्द केली म्हणून मी गुडघे टेकणार असं जर भाजपाला वाटणार असेल तर त्यांना आत्ताच सांगतो की हे होणार नाही.
१०) सत्य बोलणं हे माझ्या रक्तात आहे. मी सत्य बोलतच राहणार. देशातल्या लोकांनी मला प्रेम, आपुलकी, माया दिली आहे. त्यामुळे सत्याच्या मार्गावर चालत राहणं ही माझी तपस्या आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन आज हे दहा महत्त्वाचे मुद्दे मांडले. तसंच काहीही केलं तरीही मी या सरकारपुढे झुकणार नाही माफी मागणार नाही असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.