बदनावलू (कर्नाटक) :‘‘सत्ताधाऱ्यांनी महात्मा गांधीजींचा वारसा असल्याचा दावा करणे सोपे आहे. मात्र, परंतु त्यांच्या पावलावर चालणे कठीण आहे. महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या विचारसरणीद्वारे गेल्या आठ वर्षांत देशात विषमता, विभाजनाचे राजकारण केले गेले. कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य नष्ट झाले आहे,’’ अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी यांनी रविवारी येथे केली.

येथील खादी ग्रामोद्योग केंद्राला भेट दिल्यानंतर गांधींजींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना ते बोलत होते.  महात्मा गांधींनी १९२७ व १९३१ मध्ये या खादी ग्रामोद्योग केंद्राला भेट दिली होती. राहुल यांनी या केंद्रात प्रार्थना सभेला उपस्थित राहून महिला विणकरांशी संवाद साधला. नंतर ते म्हैसूरजवळील बदनावलू गावात गेले आणि ‘श्रमदान’ करण्याबरोबरच गावकऱ्यांशी संवाद साधला. गावातील मुलांसह त्यांनी तिरंगा रंगवला.

गांधीहत्येच्या विचारधारेशी लढा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका निवेदनात राहुल म्हणाले, की आम्ही भारताचे महान सुपुत्र महात्मा गांधीजींचे स्मरण करून, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा आज २५ वा दिवस आहे. या पदयात्रेत आम्ही त्यांच्या अहिंसा, एकता, समता आणि न्यायाच्या मार्गाचे अनुसरण करत आहोत. गांधीजींनी ज्या मार्गाने ब्रिटिश राजवटीशी लढा दिला, त्याच मार्गाने त्यांची हत्या करणाऱ्या विचारधारेशी आम्ही लढत आहोत.