Congress leader Backs Peter Navarro on brahmins profiteering Remark : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादल्याने दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे बनले आहेत. यादरम्यान ट्रम्प यांचे व्यापारविषयक सल्लागार पीटर नवारो हे सातत्याने खळबळ उडवून देणारी विधाने करत आहेत. नुकतेच त्यांनी भारत सामान्य नागरिकांचं नुकसान करून ब्राह्मणांचा फायदा करून देत असल्याचे विधान केले आहे. या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत असून काँग्रेसचे नेते उदित राज यांनी रविवारी नवारो यांच्या विधानाचे समर्थन केले आहे.
रशियाकडून तेल खरेदी करत असल्यावरून अमेरिकेने भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादला आहे. यावर बोलताना भारतातील उच्चवर्णीय कॉर्पोरेट हाऊसेस रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीतून नफा कमवत आहेत आणि नवारे यांनी जे म्हटले ते वस्तुस्थितीनुसार बरोबर असल्याचे काँग्रेस नेते म्हणाले आहेत.
माजी खासदार उदित राज यांनी आरोप केला की रशियकडून तेल खरेदी केल्याचा फायदा फक्त देशातील उच्चवर्णीय उद्योजकांनाच पोहचत आहे.
“मी पीटर नवारो यांच्या विधानाशी पूर्णपणे सहमत आहेकी ब्राम्हणांच रशियाकडून तेल खरेदी केल्याचा फायदा होत आहे. हे देखील सत्य आहे की भारतातील बहुतेक कॉर्पोरेट हाऊसेस ही उच्चवर्णीयांकडून चालवली जातात. ते रशियाकडून तेल विकत घेतात, रिफाइन करतात आणि चढ्या दराने विकतात. सामान्य भारतीयांना यापासून काहीही फायदा होत नाही,” असे काँग्रेस नेते म्हणाले.
तसेच राज यांनी देशात मागासवर्गीय जाती आणि दलितांना कॉर्पोरेट हाऊस उभं करण्यासाठी १०० वर्ष लागतील असा दावा देखील यावेळी केला. “रुजलेल्या भेदभावामुळे पुढील १०० वर्षात देखील देशात मागास जाती आणि दलितांना कॉर्पोरेट हाऊस सुरू करता येईल असे मला वाटत नाही. नवारो जे म्हणाले ते वस्तुस्थितीनुसार बरोबर आहे आणि कोणीही ते नाकारू शकत नाही, असेही राज म्हणाले.
नेमकं काय म्हणाले पीटर नवारो?
पीटर नवारो यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात विधान केले. भारतातील काही निवडक श्रीमंत व्यावसायिकांचाच आर्थिक फायदा करून दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “भारत म्हणजे क्रेमलिनसाठी (रशिया) फक्त धुणीघर आहे. भारतीयांचं नुकसान करून ब्राह्मणांचे खिसे भरताय. आपल्याला ते थांबवावं लागेल”, असं पीटर नवारो म्हणाले. भारत रशियाकडून कच्चं तेल आयात करत असून त्यावर प्रक्रिया करून ते प्रीमियम दर्जाचं म्हणून युरोपला विकत आहे, असंही नवारो म्हणाले.
रशियाकडून कच्च्या तेलाची आयात थांबवण्यास भारताने नकार दिल्यानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच्या २५ टक्के टॅरिफमध्ये २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादले आहे. यानंतर अमेरिका-भारत संबंध गेल्या काही दिवसांपासून चांगलेच ताणले गेले आहेत.