संसदेला टाळत असल्याबद्दल विरोधकांचे  अस्त्र; आज खासदारांची निदर्शने

नोटाबंदीवरून संसदेचे कामकाज पूर्णपणे बंद पाडल्यानंतर दहा पक्षांची विरोधी आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध संसदेचा हक्कभंग केल्याचा प्रस्ताव आणण्याच्या तयारीला लागली आहे. त्याचबरोबर सरकारवरील दडपण आणखी वाढविण्यासाठी आज (बुधवार) संसदेच्या प्रांगणातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे धरली जाणार आहेत. त्यात सुमारे अडीचशे विरोधी खासदार सहभागी होण्याची शक्यता आहे.

राज्यसभेतील पहिला दिवसवगळता दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ आणि गदारोळाचे वातावरण आहे. मंगळवारचा दिवसही त्यास अपवाद नव्हता. सभागृहात कामकाज न होण्याचे सर्व खापर विरोधकांनी मोदींच्या अनुपस्थितीवर फोडले आहे. ‘सव्वाशे कोटी जनतेचा जीव टांगणीला लागला असताना पंतप्रधान संसदेमधील कार्यालयात बसतात; पण सभागृहामध्ये का येत नाहीत?’ असा सवाल राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केला. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येच्युरींचे म्हणणे तेच होते. स्वत: घोषणा केलेल्या निर्णयाची कारणमीमांसा करण्यात पंतप्रधानांना अडचण वाटता कामा नये. पंतप्रधान जर संसदेला टाळत असतील आणि संसदेप्रति असलेल्या जबाबदारीची पायमल्ली करीत असतील तर आम्हाला त्यांच्याविरुद्ध हक्कभंग आणण्याचा विचार करावा लागेल. यासंदर्भात विरोधी पक्षांशी बोलणे चालू असल्याचे येच्युरींनी सांगितले.

दोन्ही सभागृहातील कामकाज बंद पाडल्यानंतर काँग्रेस, तृणमूल, डावे, संयुक्त जनता दल, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा, द्रमुक या दहा पक्षांची एकत्रित बैठक झाली. त्यास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी उपस्थित होते. त्यानुसार, बुधवारी संसदेतील गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे धरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर राष्ट्रपती भवनवर मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, विरोधकांच्या या बैठकीला समाजवादी, बिजू जनता दल, अण्णाद्रमुक आदी महत्त्वाच्या पक्षांनी दांडी मारली.

बालिश वागण्याचा खेद  

तत्पूर्वी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजनांनी सदस्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला. शेवटी चिडून त्या म्हणाल्या, ‘तुमच्या बालिश वागण्याचा खेद होतोय. तुम्हाला जबाबदारी कळली पाहिजे. सभागृहाचे नियोजित कामकाज झाले पाहिजे. त्यासाठी माझा प्रयत्न असेल. पण म्हणून मी मर्यादा सोडणार नाही. सदस्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे.’