Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकादा आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. निवडणूक आयोगाचा डेटा दाखवत एक लाख मतांची चोरी केवळ एकाच लोकसभा मतदारसंघात झाल्याचा आरोप केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ४० लाखांहून अधिक मतं ही संशयाच्या घेऱ्यात आहेत असं राहुल गांधी म्हणाले. निवडणूक आयोग या याद्यांवर गप्प का? असं म्हणत त्यांनी ढिगभर पुरावे आणि मतदार याद्याच दाखवत सादरीकरण केलं आणि निवडणूक आयोगावर आरोप केले.
निवडणुकीबाबत काय म्हणाले राहुल गांधी?
महाराष्ट्र निवडणुकीत ४० लाख मतांचा घोटाळा झाला. एक काळ असा होता की ईव्हीएम नव्हतं तरीही मतदान प्रक्रियेचे टप्पे तयार करण्यात आले. त्यामध्ये साधारण महिनाभराचा तरी काळ लागला. एक महिन्याचा काळ आणि टप्प्यांमध्ये निवडणूक कशासाठी? लोकसभा निवडणुकीचा काळ आठवा असं राहुल गांधी म्हणाले. आमच्या संशयाला पाठबळ मिळालं तेव्हा महाराष्ट्र निवडणुकीचा आम्ही अभ्यास केला. यातला नेमका तर्क आम्हाला सापडत नव्हता.
१ कोटी मतदार पाच महिन्यांमध्ये वाढले-राहुल गांधी
महाराष्ट्रात जी विधानसभा निवडणूक पार पडली त्यावेळी पाच महिन्यांत इतके मतदार वाढले जे मागच्या पाच वर्षांत वाढले नव्हते. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतरच्या पाच महिन्यांत ४० लाख मतदार वाढले. ही बाब आश्चर्यकारक होते. तसंच संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदान मोठ्या प्रमाणावर वाढलं. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत आम्हाला घवघवीत यश मिळालं. पण विधानसभा निवडणुकीत आम्ही बाहेर फेकलो गेलो. या दरम्यान १ कोटी मतदार संख्या वाढली असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे. हे असं कसं झालं याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही मतदारांची यादी मागवली पण ती देण्यास आम्हाला निवडणूक आयोगाने नकार दिला.
नव्या मतदारांचं गौडबंगाल कसं केलं याबाबत काय म्हणाले राहुल गांधी?
नव्या मतदारांनी, तरुण मतदरांनी भाजपाला मतदान केलं असं सांगण्यात आलं. त्यासाठी फॉर्म ६ चा उपयोग करण्यात आला. पण ३३ हजार ६९२ नावांचा दुरुपयोग करण्यात आला. तुम्हाला एक उदाहरण देतो. शकुन राणी नावाची एक महिला आहे ही महिला ७० वर्षांची आहे. तिने दोन वेळा अर्ज क्रमांक ६ भरला. आता हे बघा शकुन राणी असं नाव आहे. या फोटोत याच महिलेचा फोटो झूम करुन लावण्यात आला आहे. दुसऱ्यांदा या महिलेने दोनदा अर्ज केला. दुसऱ्या अर्जावर हे नाव फक्त शकुनराणी आहे. या महिलेने दोनदा मतदान केलं किंवा दुसऱ्यांदा तिच्या नावे दुसऱ्या कुणीतरी मतदान केलं. ३३ हजार ६९२ नावं पाहिली तर आणि त्यांची वयं पाहिली तर ती ९५, ९६, ९८, ६५, ६६ अशी आहेत. ३३ हजार ६९२ नावांपैकी एकही नाव असं नाही जे खरं आहे. ही संपूर्णच्या संपूर्णच्या संपूर्ण यादी खोटी आहे. बंगळुरु लोकसभा निवडणुकीत ही अशा पद्धतीने मतांची चोरी करण्यात आली हे राहुल गांधींनी प्रेझेंटेशन करत मांडलं आहे.
१ लाख २५० मतांची चोरी झाली. त्यापैकी ११ हजार ९६५ मतदारांची नावं बनावट होती. खोटे पत्ते असलेले ४० हजार ९ मतदार होते. चुकीचे फोटो असलेले ४ हजार १३२ मतदार आहेत. फॉर्म ६ चा दुरुपयोग केलेले ३३ हजार ६९२ मतदार या यादीत आहेत असा आरोप राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केला. ही एकट्या बंगळुरुतली यादी आहे असंही राहुल गांधी म्हणाले. यासाठी आम्ही महादेवपुरा हा एक मतदारसंघ निवडला होता. त्यातच आम्हाला मतांची चोरी सापडली. असं विधान राहुल गांधींनी केलं आहे.
मतांची चोरी पाच मार्गांनी करण्यात आली? काय आहे राहुल गांधींचा दावा?
डुप्लिकेट व्होटर्स, एक मतदाराचं नाव मतदार यादीत जास्तवेळा येणं.
खोटे पत्ते आणि तपशील : मतदारांचे खोटे पत्ते देऊन आणि बनावट ओळख निर्माण करुन
एकाच पत्त्यावर ५० ते ६० लोक राहात असल्याचं दाखवण्यात आलं. प्रत्यक्षात त्या ठिकाणी ४ ते ५ लोकच राहात होते.
चुकीचे फोटो, असे फोटो वापरण्यात आले जे मतदार यादीत स्पष्ट दिसणार नाहीत. असे फोटो जे नीट ओळखताच येणार नाहीत.
फॉर्म ६ चा दुरुपयोग करुनही मतदार याद्यांमध्ये घोळ केला गेला.
असे पाच प्रकार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून समोर आणले.