देशात करोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील ‘आप’ कारणीभूत आहेत. या पक्षांनी महाभयानक संकटातही गलिच्छ राजकारण केले, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केली. या दोन्ही पक्षांनी त्यांच्या राज्यांमध्ये इतर राज्यांमधून आलेल्या लोकांना स्वत:च्या राज्यात परतण्यासाठी प्रोत्साहन दिल्याने करोनाचा प्रादुर्भाव वाढला अशी टीका मोदींनी केलीय. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी एक तासाहून अधिक केलेल्या भाषणात काँग्रेसवर टीका आणि आरोपांचा भडिमार केला. याच टीकेवरुन आता काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी भाजपावर टीका केलीय.
थरुर यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी केलेलं भाषण हे राजकीय होतं अशी टीका केलीय. “त्यांनी (पंतप्रधान मोदींनी) त्यांच्या संपूर्ण भाषणामध्ये केवळ काँग्रेसवर टीका केली. त्यांचं हे भाषण राजकीय होतं ज्यामधील बराचसा भाग हा काँग्रेसवर टीका करणारा होता. माझ्या मते आम्हाला आनंद झाला पाहिजे की ते आम्हाला या नजरेने पाहतात,” असा टोला थरुर यांनी लगावलाय.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणामध्ये काँग्रेसला ‘टुकडे टुकडे गँग’चं प्रमुख म्हटलं. इंग्रज निघून गेले पण, तोडा आणि राज्य करा, ही त्यांची वृत्ती काँग्रेसला देऊन गेले. काँग्रेस हा ‘टुकडे टुकडे गँग’चा नेता बनला आहे, असा गंभीर आरोप मोदींनी केला. काँग्रेसची सत्तेत येण्याची इच्छा संपलेली आहे पण, विभाजनवादाची मुळे बळकट करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. गेली ७० वर्षे काँग्रेसने विभाजनवादाचा खेळ खेळला, पण, हा देश अमर होता, श्रेष्ठ होता, आहे आणि राहील, असे मोदी म्हणाले. याच टीकेवरुन उत्तर देताना थरुर यांनी, “काही वर्षांपूर्वी मी म्हणालो होतो की भाजपा हीच खरी ‘टुकडे टुकडे गँग’ आहे. त्यांनी हिंदू-मुस्लिमांना धर्माच्या आधारे तर भाषेच्या आधारे उत्तर-दक्षिण भारत अशी दुही निर्माण केलीय. भाजपा हे विभाजन करत आहे,” असा टोला लगावलाय.
‘अहंकार जात नाही..’
काँग्रेसने ५० वर्षे राज्य केले पण, नंतर सत्ता का गमावली, याचा पक्षाने विचार केला पाहिजे. नागालँडने १९९८ मध्ये, ओडिशाने २७ वर्षांपूर्वी काँग्रेसला अखेरचे निवडून दिले होते. गोव्यात २८ वर्षांपूर्वी काँग्रेसने बहुमताने सत्ता मिळवली होती. त्रिपुरात १९८८ नंतर, तर पश्चिम बंगालमध्ये १९७२ नंतर काँग्रेसला सत्ता मिळवता आलेली नाही. तेलंगण राज्य बनवण्याचे श्रेय तुम्ही (काँग्रेस) घेता पण, लोकांनी ते मान्य केलेले नाही. इतक्या निवडणुकांमध्ये पराभव पत्करूनही काँग्रेसचा अहंकार कमी झालेला नाही, अशी टीका मोदींनी केली.