शिवराज यादव, सांगली

सांगलीतील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते सध्या स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करण्यात व्यस्त आहे. एकेकाळी बालेकिल्ला असणाऱ्या या जिल्ह्यात स्वाभिमानी पक्षासाठी जागा सोडण्याची वेळ काँग्रेस पक्षावर आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांना सर्वात जास्त उणीव जाणवत आहे म्हणजे दिवंगत नेते पतंगराव कदम यांची. आज पतंगराव साहेब असते तर सांगलीत एकतर्फी निवडणूक झाली असती असं काँग्रेस समर्थकांचं म्हणणं आहे.

युवा काँग्रेसचे पदाधिकारी वैभव उगळे यांनी सांगितलं की, प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन आम्ही उमेदवाराची माहिती पुरवत आहोत. तसा हा काँग्रेसचा बालेकिल्लाच आहे, मात्र चिन्ह बदललं असल्याने ते पोहोचवायला लागत आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचं चिन्ह नसल्याची उणीव जाणवत असल्याचं सांगितलं.

चिन्हाची जाणीव होते, पण आम्ही १०० टक्के उमेदवार निवडून आणू शकतो असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. दिवंगत नेते पतंगराव कदम असते तर आज परिस्थिती वेगळी असती का असं विचारलं असता पतंगराव साहेबांची उणीव वेळोवेळी भासते. अतिशय अभ्यासू आणि काँग्रेसचं राज्यातील एक अनुभवी नेतृत्त्व गेल्याची उणीव पक्षाला आणि त्यांच्या मतदारसंघातील असल्याने आम्हालाही नक्कीच भासते अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

सध्याची परिस्थिती पाहता साहेब असते तर ही निवडणूक १०० टक्के एकतर्फी काँग्रेसच्या बाजूने झाली असती असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. साहेब नसल्याने बऱ्याच अडचणी समोर येत आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं. भाजपावर टीका करताना आज ते स्तरावर फेल गेले आहेत. जीएसटी, नोटांबदी यासारखे निर्णय तसंच रोजगार आणि आरक्षणाचं अमिष दाखवल्याने सगळ्यांमध्येच नाराजीची लाट आहे. आपली आश्वासनं पूर्ण करण्यात फेल गेली आहे. यामुळे गेल्या निवडणुकीत जे उमेदवार त्यांच्याकडे गेले ते पुन्हा आमच्याकडे परततील असा विश्वास व्यक्त केला.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेवाराचा फटका बसेल का विचारलं असता काँग्रेस समर्थक अजित कदम यांनी, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा फटका आम्हाला बसणार नाही. गेल्यावेळी संजय पाटील यांना गोपीचंद पडळकर यांनी समर्थन दिलं होतं. यावेळी पडळकर निवडणूक लढवत असल्याने त्यांच्यातच मतांचं विभाजन होईल पण याचा फटका आमच्या उमेदवाराला बसणार नाही अशी माहिती त्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साहेब असते तर दोन मिनिटांत उमेदवारी निर्णय झाला असता, उगाच एवढं लांबवत बसले नसते असं काही काँग्रेस कार्यकर्ते सांगतात. गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रसचे कट्टर समर्थक असणाऱ्या एका कार्यकर्त्याने तर काँग्रेसने दगड जरी उभा केला असता तर समर्थन दिलं असतं असं भावनिक मत सांगितलं. पण आता त्यांनी समर्थन दिलेल्या पक्षाच्या उमेदवाराला मत द्यावं लागतंय अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.