Pawan Khera and Jairam Ramesh on Boycotting Turkey : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्किये (तुर्कस्तान) व अझरबैजानने पाकिस्तानला मदत केली आहे. परिणामी भारतातून अझरबैजान व तुर्कियेला जाणाऱ्या पर्यटकांनी या दोन देशांकडे पाठ फिरवली आहे. आगामी काळात या दोन्ही देशांमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांपैकी अनेकांनी त्यांचे बुकिंग्स रद्द केले आहेत. तसेच बुकिंग्समध्ये नेहमीपेक्षा ६० टक्के घट झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बुकिंग रद्द करणाऱ्यांची संख्या २५० टक्क्यांनी वाढली आहे. आपल्या देशाबद्दल एकजुटीच्या भावनेत आणि आपल्या सशस्त्र दलांच्या प्रति गहिरा आदर व्यक्त करत पर्यटकांनी बुकिंग रद्द केली आहेत.

समाजमाध्यमांवर बॉयकॉट तुर्किये (तुर्कस्तानावर बहिष्कार घाला) व बॉयकॉट अझरबैजान अशी मोहीम देखील सुरू झाली आहे. दरम्यान, या बहिष्कार मोहिमेबाबत वेगवेगळे पक्ष, नेते व सेलिब्रेटी त्यांच्या भूमिका मांडत असतानाच काँग्रेस नेत्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी याबाबत प्रश्न विचारला असता वेगळाच गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेसचे दोन प्रमुख नेते या बहिष्काराबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना एकमेकांकडे माइक सरकवताना दिसले.

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश व प्रवक्ते पवन खेरा यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेवेळी वार्ताहरांनी दोघांना तुर्कीयेवरील बहिष्काराबाबतचा प्रश्न विचारला, त्यावरील काँग्रेसची भूमिका विचारली असता दोन्ही नेते माइक एकमेकांकडे सरकवत होते. मात्र, प्रसंगावधान ओळखून पवन खेरा म्हणाले, “याबाबत आम्ही नंतर बोलू”. काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांमधील गोंधळाचा व्हिडीओ भाजपा नेते समाजमाध्यमांवर शेअर करून काँग्रेसवर टीका करत आहेत. त्यानंतर पवन खेरा यांना समाजमाध्यमांवरून याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागली.

भाजपाची टीका

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी यावरून काँग्रेसला चिमटा काढला आहे. ते म्हणाले, “तुर्कीये व अझरबैजान या दोन देशांनी दहशतवादी राष्ट्र पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भारतातील नागरिक संतापले आहेत. भारतीय नागरिकांकडून या दोन देशांवर बहिष्कार घालण्याची मागणी तीव्र होऊ लागली आहे. लोकांची या दोन देशांविरोधात एकजूट निर्माण झाली आहे. मात्र, काँग्रेस भारतीय जनतेच्या भावनेबरोबर उभी राहण्यास असमर्थ असल्याचं दिसत आहे. हा पक्ष आतून पूर्णपणे मोडखळीस आला आहे. त्यांच्यात अंतर्गत मतभेद आहेत. ते असे अधून-मधून दिसत असतात”.

पवन खेरांचं स्पष्टीकरण

यावर पवन खेरा म्हणाले, “भाजपाच्या व्यक्तीने तो प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे भारताचे परराष्ट्र मंत्री व पंतप्रधान कार्यालयाने याबाबतची देशाची भूमिका स्पष्ट करायला हवी. सरकारने स्पष्ट करावं की त्यांनी तुर्कीयेचा दूतावास बंद केलाय का? तुर्कीयेशी राजनैतिक व व्यापारी संबंध तोडले आहेत का? देशाचं परराष्ट्र धोरण सरकार ठरवतं, विरोधी पक्ष नव्हे. सरकारने तातडीने याबाबतची भूमिका स्पष्ट करावी”.