काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आजपासून केरळमधल्या वायनाड या ठिकाणी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या तीन दिवसीय दौऱ्याला आजपासून सुरूवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. याच रोड शो दरम्यान त्यांनी एका चहाच्या दुकानात जाऊन कार्यकर्त्यांसोबत चहा आणि नाश्त्याचा आस्वाद घेतला. राहुल गांधी यांची कार्यकर्त्यांसोबत चाय पे चर्चा कशी रंगली होती त्याचे फोटोच एएनआयने ट्विट केले आहेत.

राहुल गांधी हे वायनाड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. मल्लापूरम जिल्ह्यातल्या चोकड या ठिकाणी जेव्हा त्यांचा रोड शो सुरू होता तेव्हा राहुल गांधी एका दुकानात गेले. तिथे त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत चहा आणि नाश्त्याचा आस्वाद घेतला. काँग्रेस अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आपल्या दुकानात आल्याने दुकानदारही हरखून गेला. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे नेते मुकुल वासनिकही होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दीही केली होती.