नवी दिल्ली : हरिद्वारमध्ये अलीकडेच झालेल्या ‘द्वेषपूर्ण भाषण परिषदेचा’ (हेट स्पीच कॉन्क्लेव्ह) काँग्रेस व तृणमूल काँग्रेससह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी निषेध केला असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हरिद्वारमध्ये अलीकडेच झालेल्या धर्म संसदेत मुस्लिमांच्या विरोधात कथितरीत्या ‘द्वेषयुक्त भाषणे’ करण्यात आल्याचे सांगून या कार्यक्रमाचे आयोजक आणि वक्ते यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अ.भा. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांनी केली. या कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी कथितरीत्या प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषणे करून अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांच्या हत्येचे आवाहन केले, असे गोखले यांचे म्हणणे आहे. १७ ते २० डिसेंबर या काळात हरिद्वारमधील वेद निकेतन धाममध्ये झालेली ही धर्म संसद जुना आखाड्याचे यती नरसिंहानंद गिरी यांनी आयोजित केली होती. द्वेषपूर्ण भाषणे करण्यासाठी पोलिसांची यापूर्वीच त्यांच्यावर नजर आहे.