भाजपा आणि काँग्रेस या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांमध्ये कायमच आरोप-प्रत्यारोप आणि टीका होताना दिसते. केंद्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून भाजपावर विविध मुद्द्यांवरून निशाणा साधण्यात येतो. यामध्ये अनेकदा खोचक टीकेचा देखील समावेस असतो. काँग्रेसचे नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी यासंदर्भात एका खोचक ट्वीटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. यामध्ये राहुल गांधींनी मोदींची टू-डू लिस्ट शेअर केली असून त्यात देशातील चर्चेत असलेल्या मुद्द्यांवरून टीका केली आहे.

पहिल्या क्रमांकावर पेट्रोल-डिझेल!

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार असल्याचं बोललं जात होतं. त्यानुसार आता हळूहळू देशभरातील पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असताना राहुल गांधींनी केलेल्या ट्वीटमध्ये पंतप्रधानांच्या टू-डू लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर पेट्रोल-डिझेलच असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत. “पेट्रोल-डिझेल-गॅसच्या किमती किती वाढवू”, असं राहुल गांधींनी शेअर केलेल्या लिस्टमध्ये लिहिलं आहे.

ट्वीटमधील यादीमध्ये इतर मुद्दे कोणते?

राहुल गांधींनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये अनुक्रमे ५ मुद्दे मांडण्यात आले आहेत.

“पंतप्रधानांची रोजची टू-डू लिस्ट

१- पेट्रोल-डिझेल-गॅसच्या किमती किती वाढवू…
२- लोकांची खर्चावर चर्चा कशी थांबवू…
३- तरुणांना रोजगाराची खोटी स्वप्न कशी दाखवू
४- आज कोणती सरकारी कंपनी विकू
५- शेतकऱ्यांना अजून लाचार कसं करू…”

आपल्या ट्वीटमध्ये राहुल गांधींनी मन की बातच्या पार्श्वभूमीवर #RozSubahKiBaat असं देखील खाली म्हटलं आहे.