ध्रुवीकरणाचा प्रयत्न अयशस्वी ठरला तेव्हा भाजप आणि मोदींनी भावनात्मक वक्तव्ये करत गुजरातच्या जनतेला संभ्रमित केले, असे म्हणत निकाल काहीही असो, पक्षाचा हा नैतिक विजय असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. गुजरातमध्ये अहंकाराचा पराभव झाला असून जनतेने अहंकार, धनशक्तीला आरसा दाखवला आहे. आम्ही दोन्ही राज्यातील जनतेचा निर्णय स्वीकारतो, असेही पक्षाने गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर म्हटले.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, अशोक गहलोत, प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पराभवावर पक्षाची भूमिका मांडली. गहलोत म्हणाले, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने नैतिक विजय मिळवला आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे काँग्रेसचा विजय झाला आहे.

राहुल गांधी यांनी भाजपला ९९ च्या आकड्यातच गुंतवल्याचे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले. गुजरातचे मुद्दे आणि त्यांचे परिणाम येणे अजून बाकी आहे. या सर्वांसाठी काँग्रेस पक्ष लढत राहील. भाजपने हे विसरू नये की हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार धुमल यांचा पराभव झाला आहे. मोदींना त्यांच्याच मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागल्याचे भाजपने विसरू नये, असा टोलाही लगावला.

मतमोजणीची आधी आणि नंतर मतदानाची तारीख जाहीर होण्याची देशाच्या इतिहासातातील ही पहिलीच वेळ आहे. लोकशाहीचे संरक्षण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे. आमचा पराभव झाला आहे, पण आम्ही युद्ध जिंकलो आहोत. छाती मोठी आहे, आता मनही मोठे करा आणि अस्थिर विकासाला स्थिर करा, असा उपहासात्मक टोलाही त्यांनी लगावला. दोन अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचाही पाठिंबा असून काँग्रेसचे संख्याबळ ८४ इतके होते. तर भाजप ९८ ते ९९ या आकड्यातच आहे, अशी माहिती सुरजेवाला यांनी दिली.