जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवण्यात आल्याचा विरोध केला जात असल्यावरून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसवर टीकस्र सोडले आहे. ” कलम ३७० वरील राहुल गांधी यांच्या वक्तव्याची पाकिस्तानच्या संसदेत प्रशंसा होते, त्यांच्या या वक्तव्याचा वापर संयुक्त राष्ट्रात सादर केलेल्या याचिकेत पाकिस्तानकडून केला जातो, यासाठी काँग्रेसने जरा तरी लाज बाळगायला हवी.” असे गृहमंत्री शाह यांनी म्हटले आहे.

केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेलीतील एका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी ”काँग्रेसने कलम ३७० हटवण्याचा विरोध केला, आजही राहुल गांधी जे वक्तव्य करत आहेत त्याची पाकिस्तानात प्रशंसा होत आहे, त्यांच्या वक्तव्याचा वापर पाकिस्तान आपल्या याचिकेत करतो, काँग्रेसला लाज वाटायला हवी की त्यांच्या वक्तव्याचा उपयोग भारताविरोधात केला जात आहे.” असे म्हटले.

गृहमंत्री शाह यांनी यावेळी हे देखील म्हटले की, जेएनयूत देशविरोधी घोषणाबाजीचे प्रकरण असो किंवा मग सर्जिकल स्ट्राइक व एअर स्ट्राइक असो काँग्रेसने अशा गंभीर मुद्यांवर सरकारविरोधी भूमिका घेतलेली आहे. आम्ही हे विचारू इच्छितो की, तुम्ही कोणत्या प्रकारचे राजकारण करू इच्छित आहात?, कलम ३७० वरून देशाची जनता ठामपणे पंतप्रधान मोदींबरोबर उभी आहे. कलम ३७० आणि ३५-ए हे देशाच्या एकतेतील अडसर होते. मोदींना देशाने पुन्हा पंतप्रधान बनवले व त्यांनी संसदेच्या पहिल्याच सत्रात कलम ३७० हटवले. मोदींशिवाय हे काम कोणीच करू शकत नव्हते.

काँग्रेसाला उद्देशुन गृहमंत्री शाह म्हणाले की, ७० वर्षे देशात अनेक पक्षांचे सरकार होते, काही लोकांच्या तीन-तीन पिढ्यांनी देशावर राज्य केले मात्र त्यांच्यात कलम ३७० हटवण्याची धमक नव्हती. आता कलम ३७० हटवण्यात आल्याने जम्मू-काश्मीरच्या विकासाचे मार्ग उघडले आहेत. तसेच, कलम ३७० हटवण्यात आल्यापासून या ठिकाणी शांततेचे वातारण आहे. या निर्णयापासून ते आतापर्यंत एकही गोळी चाललेली नाही, अश्रूधारांच्या नळकांड्याही फोडव्या लागल्या नाहीत. कोणालाही जीव गमवावा लागलेला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.