नवी दिल्ली : अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदीतील करारामध्ये लाचखोरी झाल्याने वादग्रस्त ठरलेल्या ‘ऑगस्टा वेस्टलँड’ची मूळ कंपनी ‘फिनमेकानिका’वरील बंदी मागे घेण्याच्या केंद्र सरकारच्या कथित निर्णयाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. या संदर्भात केंद्र सरकारने अजून तरी अधिकृतपणे कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र, ‘आधी ऑगस्टा भ्रष्ट होती, आता भाजपच्या लॉन्ड्रीत स्वच्छ झाली आहे’, अशी उपहासात्मक टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केली.

केंद्रातील तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने नौदलासाठी १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार इटलीतील कंपनी ‘ऑगस्टा वेस्टलँड’शी केला होता. मात्र, ३,५०० कोटींच्या या खरेदीकरारात भारतातील राजकीय नेते, सरकारी तसेच, हवाई दलातील उच्चपदस्थ अधिकारी यांना ३६० कोटींची लाच दिल्याचा आरोप झाल्यानंतर ‘यूपीए’ सरकारने हेलिकॉप्टर खरेदीकरार रद्द केला व या कंपनीवर बंदी घालून तिला काळ्या यादीत टाकले. या प्रकरणातील लाचखोरीवरून तत्कालीन विरोधी पक्ष भाजपने मनमोहन सिंग सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र, २०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यावर मोदी सरकारने ‘ऑगस्टा वेस्टलँड’ला काळ्या यादीतून काढून टाकले. आता मूळ कंपनी ‘फिनमेकानिका’वरील बंदीही रद्द केली जाणार असेल तर ‘ऑगस्टा वेस्टलँड’ला केंद्र सरकार पाठिशी घालत असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी सोमवारी  केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिनमेकानिका’ला भ्रष्ट म्हटले होते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फिनमेकानिकाला बनावट ठरवले होते. तत्कालीन संरक्षणमंज्ञी मनोहर पर्रिकर यांनी संसदेत बोलताना या खरेदीप्रकरणात लाचखोरीचा आरोप केला होता. मग, २२ जुलै २०१४ मध्ये ‘ऑगस्ट वेस्टलँड’ला (फिनमेकानिका) काळ्या यादीतून का काढले गेले, आणि आता या कंपनीवरील बंदी का मागे घेतली जात आहे, असा प्रश्न वल्लभ यांनी केला. यूपीए सरकारने ‘फिनमेकानिका’कडून खरेदी करारातील २ हजार २०० कोटी रुपये वसूल केले होते पण, आता मोदी सरकार या भ्रष्ट कंपनीला पाठिशी घालत असल्याचा आरोपही वल्लभ यांनी केला.  २०१३ मध्ये हेलिकॉप्टर खरेदीकरारातील लाचखोरीची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्याची तयारी यूपीए सरकारने दाखवली होती पण, भाजपचा पाठिंबा मिळाला नव्हता. जानेवारी २०१४ मध्ये खरेदीकरार रद्द करण्यात आला पण, तोपर्यंत कंपनीला १६२० कोटी देण्यात आले होते व ३ हेलिकॉप्टर भारताच्या ताब्यातही दिले होते.

मोदींच्या इटली दौऱ्याचा उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या आठवड्यात इटलीच्या दौऱ्यावर असताना त्यांची रोममध्ये इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांची भेट झाली होती. या पार्श्वभूमीवर, ‘फिनमेकानिका’ आणि मोदी सरकारमध्ये कोणता गोपनीय करार झाला आहे, ज्याद्वारे भ्रष्ट कंपनी अचानक मोदी सरकारला धुतल्या तांदळासारखी शुभ्र वाटू लागली आहे, असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला.