‘सर्व मोदी चोर का आहेत’ असे वक्तव्य करणारे काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली असून नामदारांच्या (राहुल गांधी) तोंडी असली वाक्ये शोभत नाहीत असे त्यांनी सांगितले. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी काँग्रेसने हातमिळवणी केल्याचा आरोप त्यांनी केला.
येथील प्रचार सभेत त्यांनी सांगितले की, आक्षेपार्ह वक्तव्ये हा आता नामदारांचा स्थायी भाव झाला आहे. त्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. शिवीगाळ, अपशब्द वापरणे हे आता नेहमीचेच झाले आहे. येथील साहू समुदायाला गुजरातमध्ये मोदी असेच नाव आहे मग ते काय सर्व चोर आहेत असे समजायचे का, असा सवाल त्यांनी केला.
भाजप आमदार भीमा मांडवी मारले गेले त्या भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी झाला असताना आता तेथे अशी हल्ल्याची घटना का घडली, असा सवाल करून त्यांनी हल्ल्यास काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला. नक्षलवाद्यांशी काँग्रेसचे साटेलोटे आहे असा आरोप करून ते म्हणाले, काँग्रेसच्या जाहीरनाम्यानंतर हिंसाचार करणाऱ्या दहशतवाद्यांना आनंदाचे भरते आले होते कारण त्यात काँग्रेसने दहशतवादी व नक्षलवादी यांना मोक ळे रान देणाऱ्या काही तरतुदींचा उल्लेख केला होता. देशाच्या सुरक्षेशी तडजोड करण्याचा काँग्रेसचा डाव आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस नक्षलवाद्यांना उत्तेजन देत आहे. देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. काँग्रेसचा हात विकासाबरोबर नसून विनाशाबरोबर आहे. छत्तीसगडला सुरूंग हवेत की वीज व पाण्याची पाइपलाइन हे लोकांनी ठरवावे. काँग्रेस सरकार आल्यानंतर छत्तीसगडमध्ये आयुष्मान भारत मोहीम बंद करण्यात आली. पंतप्रधान किसान योजनेसाठी शेतकरी लाभार्थ्यांची नावे त्यांनी पाठवली नाहीत. काँग्रेस ही एका परिवाराची गुलामी असून काँग्रेस आता लोकांचा विश्वासघात करण्यात पीएचडी करीत आहे. त्यांचे हेतू व धोरणे साफ नाहीत. काँग्रेस देशाच्या लष्करी दलांचे विशेषाधिकार काढून घेण्याच्या तयारीत आहे तसे आश्वासन त्यांनी जाहीरनाम्यात दिले आहे अशी टीका त्यांनी केली.