पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ‘सबका साथ सबका विकास’ या धोरणाची काँग्रेसने खिल्ली उडवली आहे. केंद्र सरकारचे विकास धोरण म्हणजे ‘सबका पैसा, सरकार का विकास’ आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. जनतेकडून पैसे घेऊन या सरकारने विकासाबाबत दिलेली आश्वासने न पाळता त्यांच्या हातावर तुरी देण्याचे काम केले आहे, असा आरोपही काँग्रेसने मोदी सरकारवर केला आहे.

भ्रष्टाचाराबाबत ते काय बोलतात, हेच समजेनासे झाले आहे. केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा त्याचाच एक पुरावा आहे, असा आरोप काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी ‘एएनआय’शी बोलताना केला. आजच्या घडीला आम्ही सर्व ‘कॅशलेश’ झालो आहोत आणि सहाजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप खूश असतील. कारण त्यांनी ‘सबका पैसा, सरकार का विकास’ हे लक्ष्य पूर्ण केले आहे. आता ते वारंवार आपल्या विधानांवरून घूमजाव करत आहेत, असा आरोपही चौधरी यांनी केला आहे.

डिसेंबरनंतर सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे. त्याला जर विकास म्हणत असतील तर, त्याने आम्ही खूपच प्रभावित झालो आहोत, असा उपरोधिक टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला. दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या संयुक्त सभागृहातील अभिभाषणानंतर समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनीही टीका केली आहे. राष्ट्रपती मुखर्जी यांचे भाषण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’प्रमाणेच आहे, असे यादव यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राष्ट्रपती मुखर्जी यांनी आपल्या अभिभाषणात गरिब, शेतकरी, तरुण आणि महिलांच्या कल्याणविषयक धोरणांचा उल्लेख केला. तसेच ईशान्येकडील राज्यांच्या पर्यटनक्षेत्राला प्रोत्साहन देण्यावरही राष्ट्रपतींनी भर दिला.