काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. मी माझ्या आजीची भेट घेण्यासाठी परदेशात जात असल्याचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. देशात शेतकरी आंदोलन सुरु असताना राहुल गांधी परदेशात जाणार असल्याने त्यांच्यावर टीका होण्याची चिन्हे आहेत.

राहुल गांधी यांनी मंगळवारी ट्विटरवर त्यांच्या परदेश दौऱ्याविषयी माहिती दिली आहे. ‘आजी आणि नातेवाईकांची भेट घेण्यासाठी मी काही दिवसांसाठी परदेशात जात आहे. त्यांच्यासोबत काही काळ राहून पुन्हा भारतात परतेन’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा विविध राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. गेल्या आठवड्यात राहुल गांधी मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्यांना गावात जाऊ दिले नव्हते. शेतकरी आंदोलन चिघळत असताना राहुल गांधीही या आंदोलनात सक्रीय होऊन केंद्र सरकार आणि भाजपची कोंडी करतील अशी आशा होती. राहुल गांधी मैदानात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला होता. मात्र हे आंदोलन सुरु असतानाच राहुल गांधी इटलीत आजीला भेटण्यासाठी जाणार असल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. राहुल गांधी त्यांचा वाढदिवस झाल्यानंतरच भारतात येतील अशी शक्यता आहे. १९ जून रोजी राहुल गांधी यांचा वाढदिवस असतो.

राहुल गांधी यांचे परदेश दौरे हे नेहमीच वादग्रस्त ठरले होते. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर राहुल गांधी सुमारे दोन महिने परदेशात होते. संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनातही ते गैरहजर होते. भाजपने यावरुनही काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते.