काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरमधील अशांततेवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या धोरणांमुळे आज जम्मू काश्मीर होरपळतोय, अशी टीका त्यांनी केली आहे. काश्मीर इज इंडिया, इंडिया इज काश्मीर असल्याचे त्यांनी ठासून सांगत, भारताच्या अंतर्गत प्रश्नांत कुणी दखल देण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संसदेत जाण्यापूर्वी राहुल गांधींनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्यांवर आपली मते व्यक्त केली.  डोकलामचा वाद सुरू असतानाच काश्मीरप्रश्नी भारताने पाकबरोबर चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचा समाचार घेताना राहुल म्हणाले, चीन आणि पाकिस्तानबरोबर काश्मीरप्रश्नी चर्चा व्हावी असे बोलले जात आहे. पण तो भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. काश्मीरचा प्रश्न आम्ही सोडवू, कुणा तिसऱ्या पक्षाने त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. काश्मीर इज इंडिया, इंडिया इज काश्मीर अशा शब्दांत त्यांनी ठणकावले.

गेल्या काही महिन्यांपासून काश्मीर धुमसतोय. याला मोदी व एनडीएनची धोरणे जबाबदार आहेत. त्यांनी काश्मीरला आगीच्या खाईत ओढले आहे, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, बुधवारी राजस्थानमधील बंसवारा येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यातही राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. जीएसटीसाठी सरकार मध्यरात्री संसदेचे कामकाज सुरू ठेवू शकते. मात्र, विरोधक संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला लागले तर त्यांना एक मिनिटही बोलू दिले जात नाही, अशा शब्दांत कोरडे ओढले होते. यावेळी त्यांनी कर्जमाफीसह शेतकऱ्यांचे विविध प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले. संसदेच्या सभागृहात आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायचे असते. मात्र, आम्हाला बोलू दिले जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित असले तरी हीच गत असते. जे सरकार जीएसटीसाठी मध्यरात्री संसद सुरू ठेवू शकते, त्यांना सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी थोडाही वेळ नसतो. हाच भाजपचा खरा चेहरा आहे, असे राहुल गांधी म्हटले होते.