उत्तर प्रदेशमध्ये ४० टक्के महिला उमेदवार, प्रियंका पक्षाचा चेहरा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या समूहनिहाय राजकीय समीकरणाला काँग्रेसने महिलाशक्तीच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील पाच महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीत ४० टक्के महिला उमेदवार असतील, अशी घोषणा काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी मंगळवारी लखनऊमध्ये केली.

उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका याच निवडणुकीतील पक्षाचा चेहरा असतील, असे  नेते पी. एल. पुनिया यांनी जाहीर केले आहे. मात्र, प्रियंका स्वत: निवडणुकीतील उमेदवार असतील का, हे अजून पक्षाने स्पष्ट केलेले नाही. लखीमपूर खेरीतील हत्याकांडानंतर प्रियंका सातत्याने योगी सरकार विरोधात आœमक भूमिका घेत आहेत. याप्रकरणी राष्ट्रपतींना भेटलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळातही त्यांचा समावेश होता. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस महिला उमेदवारांना प्राधान्य देणार असला तरी त्यातही जातीनिहाय उमेदवारी दिली जाईल का, या प्रश्नावर प्रियंका यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. जिंकण्याची शक्यता असलेल्या सक्षम महिलांना उमेदवारी दिली जाईल, असे प्रियंका यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेसने पहिल्यांदाच ४० टक्के जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्याचे जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये ४०३ जागा असून किमान १६२ जागांवर काँग्रेसच्या महिला उमेदवार समाजवादी पक्ष व भाजपच्या उमेदवारांना आव्हान देतील. २०१७ मध्ये काँग्रेसने समाजवादी पक्षाशी युती केली होती व ११४  जागा लढवल्या होत्या, त्यापैकी फक्त सात जागा काँग्रेसला जिंकता आल्या. यावेळी मात्र महिलांना प्राधान्य देऊन काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.

‘अन्यायग्रस्त मुलींसाठी’

महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय चांदोली, उन्नावसारख्या उत्तर प्रदेशमधील अन्यायग्रस्त मुलींसाठी घेतलेला आहे. लखनऊमधील वाल्मिकी समाजातील तसेच उत्तर प्रदेशमध्ये बदल घडवून आणण्यासाठी तत्पर असलेल्या प्रत्येक महिलेसाठी काँग्रेसने महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत प्रियंका यांनी योगी सरकारच्या महिलाविरोधी धोरणांवर टीका केली.  २०१९  मध्ये लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना इथली परिस्थिती मी पाहिलेली आहे. अलाहाबाद विद्यपीठातील विद्यर्थिंनीसाठी कॅम्पसमध्ये, हॉस्टेलमध्ये वेगळे नियम लागू केले जातात. जिथे महाविद्यलये आहेत तिथे विद्यर्थिनींना भेदभावाला सामोरे जावे लागते पण, कित्येक गावांमध्ये शाळादेखील नाहीत, तिथल्या मुली तर शिक्षणापासूनच वंचित रहावे लागते, असे सांगत प्रियंका यांनी उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराची दिशा स्पष्ट केली.