अहमदाबाद पोलिसांच्या विशेष पथकाने गुजरात दंगल प्रकरणात आज सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रतिज्ञापत्रात काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार पाडण्यासाठी अहमद पटेल यांनी कट रचला होता, असा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. या आरोपांवर काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसकडून अहमद पटेलांवरील आरोप फेटाळून लावत, ‘मोदीजी मृत्यू झालेल्या व्यक्तींनाही सोडत नाही’, अशी टीका करण्यात आली आहे.

गुजरात पोलिसांकडून अहमद पटेलांवर आरोप

२००२ च्या गुजरात दंगलीनंतर भाजपा सरकार बरखास्त करण्यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून एक मोठा कट रचण्यात आला होता. तीस्ता सेटलवाड देखील या कटात सहभागी होत्या, असे प्रतिज्ञापत्र गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सत्र न्यायालयात दाखल केले आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आला होता. अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून, सेटलवाड यांना २००२ मध्ये गोध्रातील दंगलीनंतर ३० लाख मिळाले. तसचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची नावे या प्रकरणात गोवण्यासाठी दिल्लीत दोघांच्या बैठकीदेखील होत होत्या, असा दावाही एसआयटीने केला आहे.

काँग्रेसने फेटाळून लावले आरोप

काँग्रेसकडून अहमद पटेल यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एक पत्रक ट्वीट केले आहे. या पत्रात त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

गुजरातमध्ये झालेल्या दंगलीची जबाबदारी झटकण्यासाठी हे आरोप लावण्यात आले असल्याचे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान राजकीय सूड घेण्यासाठी मृत्यू झालेल्या व्यक्तांनी सोडत नाही, अशी टीकाही त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

हेही वाचा – गुजरात दंगल प्रकरण : “काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी नरेंद्र मोदींविरोधात कट रचला होता”; तपास यंत्रणांचा दावा