scorecardresearch

राहुल गांधींची प्रभू रामचंद्रांशी तुलना; सलमान खुर्शिदांच्या विधानावर हिंदूत्ववादी पक्ष-संघटनांची टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी राहुल गांधींची तुलना प्रभू श्रीरामचंद्राशी केल्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे.

राहुल गांधींची प्रभू रामचंद्रांशी तुलना; सलमान खुर्शिदांच्या विधानावर हिंदूत्ववादी पक्ष-संघटनांची टीका

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी राहुल गांधींची तुलना प्रभू श्रीरामचंद्राशी केल्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. हिंदूत्ववादी पक्ष-संघटनांनी यावरून खुर्शिद आणि काँग्रेसवर टीकेचा भडिमार केला आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत केवळ टी शर्ट घालून महापुरुषांच्या समाधींचे दर्शन घेतले. त्याचा संदर्भ देत खुर्शीद म्हणाले की, ‘‘गांधी हे योगी-तपस्वी असून भारत जोडो यात्रा ही त्यांची तपस्या आहे. राहुल गांधींना महापुरुषच म्हटले पाहिजे. श्रीराम सगळीकडे जाऊ शकले नाहीत, पण त्यांच्या पादुका पोहोचत असत.

भरत त्या ठिकठिकाणी घेऊन गेले. उत्तर प्रदेशमध्येही आम्ही पादुका पोहोचवल्या आहेत, आता श्रीरामही येतील,’’ असे म्हणत राहुल गांधींची तुलना श्रीरामाशी केली. त्यावर ‘‘मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस काहीही करू शकतो. उत्तर प्रदेशात दुरवस्था झालेल्या काँग्रेसला उभारी देण्यासाठी खुर्शिद यांनी जामिनावर सुटलेल्या राहुल गांधींची तुलना श्रीरामाशी केली आहे. निवडणूक आली की, राहुल गांधी हिंदू असल्याचे दाखवण्याचा दुटप्पीपणा केला जातो. लोकसभा निवडणुकीत मतदारच काँग्रेसला धडा शिकवतील,’’ अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी तोफ डागली.  

‘‘राहुल गांधी हे रामाचा अवतार असतील, त्यांना थंडी वाजत नसेल तर, त्यांनी आपल्या सेनेला नग्नावस्थेत फिरायला सांगावे,’’ असा सल्ला भाजपचे महासचिव दुष्यंत गौतम यांनी दिला आहे. ‘‘ज्यांनी श्रीरामाचे अस्तित्व नाकारले, सर्वोच्च न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्र दिले, त्यांची तुलना श्रीरामाशी कशी करू शकता? काँग्रेसच्या गलिच्छ राजकारणाची ही परिसीमाच म्हणावी लागेल,’’ अशी संतप्त टीका विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता विनोद बन्सल यांनी केली.

‘आक्षेप कशासाठी?’

कोणीही श्रीरामाचा पर्याय असू शकत नाही; पण प्रत्येकाने श्रीरामाने दाखवलेल्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या मार्गावरून राहुल गांधी निघाले असल्याचे मी म्हणालो तर, त्यावर आक्षेप कशासाठी घेतला जात आहे, असा सवाल खुर्शिद यांनी केला.

अर्ध्या बाह्यांचा उपहास!

दिल्लीत कडाक्याची थंडी असून सकाळच्या सात-आठ अंश सेल्सिअस तापमानात टी शर्ट घालून राहुल गांधी पदयात्रेत सहभागी झाले होते. त्याचा संदर्भ देत काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली होती. त्याला भाजपच्या समाजमाध्यम विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी उपहासात्मक प्रत्युत्तर दिले आहे. ‘‘आज सकाळी मला इंडिया गेटवर युरोपातून आलेले दोन पर्यटक भेटले. अर्ध्या बाह्यांचा टी शर्ट घालून ते सकाळी चालायला आले होते. मी त्यांना विचारले की, तुम्ही काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहात का? त्यावर ते हसून म्हणाले की त्यांना कडाक्याच्या थंडीची सवय आहे. थंडीत गतीने चालले की शरीरात ऊब निर्माण होते.’’

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या