पश्चिम बंगाल शासनाने हाती घेतलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलोपार्जित घराच्या पुनर्विकास कामाला त्यांच्या वंशजांपैकी काहींनी विरोध केला आह़े  दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कोडालिया येथे हे घर आह़े  सुभाषबाबूंच्या आई प्रभावती बोस यांनी त्यांच्या सात मुलांकडे हे घर सोपविले होत़े  त्यामुळे शासनाचे हे कृत्य म्हणजे अतिक्रमणच असल्याचा आरोप नेताजींच्या वंशजांच्या कुटुंबातील सदस्य चंद्रा बोस यांनी केला़
कोडालिया येथील या घरात नेताजींनी एकही दिवस काढल्याचा पुरावा नाही़  तसेच या घराशी ‘आझाद हिंद सेने’चाही काही संबंध नव्हता़  तरीही शासनाकडून कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता या घराच्या रचनेत बदल करण्यात येत आहेत़  घराभोवतीची संरक्षक भिंतही पाडण्यात आली आह़े  त्यामुळे आम्ही कुटुंबीयांनी कोलकता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही बोस यांनी सांगितल़े
याबाबत पश्चिम बंगाल राज्य वारसा आयोगाचे अध्यक्ष शुवाप्रसन्ना यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, ‘नेताजींशी संबंधित सर्व आठवणींचे संवर्धन व्हावे यासाठी या मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आम्ही ही पावले उचलली आहेत़  हे घर ताब्यात घेण्याचा आमचा कोणताही हेतू नाही़’
हे घर तब्बल १५० वर्षांपूर्वी नेताजींचे आजोबा हरनाथ बोस यांनी बांधले आह़े  आणि त्यांची आवश्यकतेनुसार वेळोवेळी दुरुस्ती करून ते सुस्थितीत राखण्यात आले आह़े  त्यामुळे शासनाच्या हस्तक्षेपाची येथे काही आवश्यकताच नाही़  या घडामोडींबाबत मुख्यमंत्र्यांना लेखी कल्पना देण्यात आली आह़े  त्यांची भेटही घेण्याचा प्रयत्न केला़  परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असे नेताजींच्या कुटुंब सदस्यांनी सांगितल़े

नेताजी सुभाषबाबूंचा जन्म कटक येथे झाला़  त्यांनी स्वत:साठी कधीच घर बांधले नाही़  ते नेहमी त्यांच्या वडिलांच्या किंवा भावाच्या घरातच राहिल़े  त्यांच्या वडिलांच्या एल्गिन मार्गावरील घराचे आधीच ‘नेताजी भवना’त रूपांतर करण्यात आले आह़े