हिंदू चोर नावाच्या एका बंगाली नाटकाच्या पोस्टरवरुन नुकताच एक वाद सुरु झाला आहे. सुमंत्रा माईती यांनी त्यासंदर्भात कलकत्ता पोलिसांकडे फेसबुकद्वारे तक्रार दाखल केली आहे. यामध्ये हे नाव आपल्या धार्मिक भावना दुखावत असल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. अनेकांनी आपल्याला राग आला असून भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले आहे. त्यानंतर हिंदू चोर हा विषय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यामध्ये एका युजरने ट्विटरवरुन या सगळ्याला ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरले आहे. त्या बोलण्याची मोकळीक असण्याच्या नावाखाली लोकांना हिंदूविरोधी बोलण्याची मुभा देतात असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कोलकाता पोलिसांनी याबाबतची तक्रार नोंदवली असून अशाप्रकारचे नाव हे समाजात तेढ निर्माण करत आहे असे म्हटले आहे. त्यामुळे या नाटकाशी निगडित असणाऱ्या व्यक्तींबाबत योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याबाबात आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही म्हटले आहे. भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अक्षय सिंग यांनी ट्विट करत आपली ज्वलंत प्रतिक्रिया दिली आहे. तर हिंदू जनजागरण समितीनेही तक्रार दाखल केली आहे. या नाटकाविरोधात ‘अत्यंत आक्षेपार्ह’ अशी नोंद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे हे नाटक हिंदूंच्या विरोधात नसून नाटकाच्या नावाच्या एकदम विरोधी आहे. पश्चिम बंगालचे भाजपा कार्यकर्त्या अपराजिता चक्रवर्ती म्हणाल्या, हे नाटक बांग्लादेशी हिंदूंना दररोज सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या त्रास आणि छळ याच्या संदर्भात आहे. फेसबुकवर एका पोस्टला केलेल्या कमेंटमध्ये याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या मित्रमंडळींनी नाटकाच्या माध्यमातून परिस्थितीचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. नाटक पाहिल्यानंतर त्यामध्ये विरोध करण्यासारखे काही आहे की नाही हे ठरवावे. सध्या बांग्लादेशमधील हिंदूंनाच या वाईट परिस्थितीची जाणीव आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्याठिकाणी कोणीही नाही.