चीनी सैन्याने लडाख भागात केलेल्या घुसखोरीबाबत पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी केलेल्या टिप्पणीची दखल अखेर चीनने घेतली आहे. सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसेच भारताशी असलेले सामरीक सहकार्याचे नाते जोपासण्याच्या दृष्टीकोनातून आपण भारताशी घुसखोरीच्या मुद्यावर चर्चा करण्यास तयार आहोत, असे रविवारी चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले.
भारताचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याची आम्ही योग्य ती दखल घेतली असून, सीमाप्रश्नावरील वाद चर्चेने सोडविण्यासाठी आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ इच्छितो, असे चीनच्या परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले. उभयराष्ट्रांमध्ये पश्चिम सीमेवरून मतभेद निर्माण झाले असले तरी हा वाद राजनैतिक मार्गाने तसेच चर्चेद्वारे सोडविण्यासाठी उभय देश प्रयत्नशील असल्याचे चीनने नमूद केले आहे. सीमाप्रश्नी समन्वयाची गरज असून त्यादृष्टीने यंत्रणा परस्परांमधील विश्वासावर आधारीत यंत्रणा उभारण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे चीनने सांगितले.
सीमा प्रश्नावरून परिस्थिती चिघळू नये अशीच आमचीही इच्छा आहे, आणि त्यादृष्टीने आमच्याही काही योजना आहेत. हा स्थानिक प्रश्न असून लवकरच तो चर्चेद्वारे सोडविण्यात आम्हाला यश येईल, अशी भावना पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले होते. यावर चीनचे मत विचारले गेले होते. त्याला अनुसरून चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. या पत्रकात चीनने नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
दौलत बेग ओल्डी भागातील घुसखोरीच्या आरोपाचा यापूर्वी चीनने इन्कार केला होता. मात्र नव्या पत्रकानुसार, उभय देशांमधील नाते सुदृढ रहावे यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका चीनने घेतली असल्याचे स्पष्ट होत आहे. मतभेदाचे मुद्दे चर्चेने सोडविणे आणि परस्परांमध्ये शांतता-सौहार्दतेचे वातावरण निर्माण करणे या मुद्यांचे आपणही समर्थन करतो असे चीनने नमूद केले आहे. गेली काही वर्षे भारत आणि चीन या देशांमध्ये अनेक क्षेत्रांत सहकार्य करार झाले आहेत, या देशांमधील व्यापारी तसेच सामरीक संबंधही विकसित झाले आहेत, असेही परराष्ट्र व्यवहार मंत्र्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान ९ मे रोजी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सलमान खुर्शीद हे चीनच्या दौऱ्यावर जाणार असून चीनचे नवनिर्वाचित पंतप्रधान भारतात यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
चीनी सैन्य उभय राष्ट्रांमधील सीमाविषयक कराराचे पालन करण्यास कटीबद्ध आहेत, आणि सीमेचे उल्लंघन करण्याचा आमचा मानस नाही असे, चीनच्या परराष्ट्र मंत्रायलाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी स्पष्ट केले. भारताचे संरक्षणमंत्री ए. के.अँटोनी यांनी भारतीय राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यास आपण कटीबद्ध आहोत असे सांगितले.