काश्मीर विद्यापीठाचे कुलगुरू खुर्शीद आंद्राबी यांच्या चारचाकी वाहनावर लावण्यात आलेली काळी फिल्म एका पोलीस अधिकाऱ्याने फाडून टाकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. सोशल मिडीयावरून या व्हिडिओवर सध्या अनेक प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. या व्हिडिओत श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर जम्मू काश्मीरचे पोलीस अपअधीक्षक शेख आदिल यांच्याशी आंद्राबी वाद घालताना दिसत आहेत. शेख आदिल यांनी महामार्गावरील तपासणीदरम्यान खुर्शीद आंद्राबी यांची गाडी थांबविली. त्यांच्या गाडीच्या काचांवर काळी फिल्म लावली होती. वाहनांच्या काचांना गडद काळी फिल्म लावण्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीन  वर्षांपूर्वी बंदी घातली आहे. त्यामुळे शेख आदिल यांनी काचांवरील ही फिल्म अक्षरश: फाडून काढली. त्यामुळे संतप्त झालेल्या आंद्राबी यांनी त्याठिकाणीच आदिल यांच्याशी हुज्जत घालायला सुरूवात केली. मात्र, मी केवळ माझे कर्तव्य पार पाडत आहे, असे सांगत आदिल यांनी आंद्राबी यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझ्या गाडीत पोलीस अधिकारी असता तर तुम्ही गाडी थांबविण्याची हिंमत केली नसती. तुम्ही केवळ दिखाऊपणासाठी हे सर्व करत आहात, असा आरोप आंद्राबी यांनी केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. अनेकांकडून शेख आदिल यांच्या धडाकेबाज कृतीचे समर्थन करण्यात येत असले तरी काहीजण त्यावर टीकाही करत आहेत. कायदा हा सर्वांसाठी समान असतो. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्याने आंद्राबी यांच्या गाडीच्या काचांवरील काळी फिल्म फाडून काही चुकीचे केले नाही, असे काहीजण म्हणत आहेत. तर आदिल शेख यांनी इतक्या कठोरपणे कारवाई करायला नव्हती पाहिजे, असे काहींचे मत आहे. पुढच्यावेळी रस्त्यावर गाडी आणण्यापूर्वी काळी फिल्म काढून टाका, असे आंद्राबी यांना सांगितले असते तर आकाश कोसळले नसते. ही घटना खूप विचलित करणारी आहे, अशा प्रतिक्रिया काही नेटिझन्सकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने गैरप्रकारांची शक्यता लक्षात घेता २०१२ मध्ये चारचाकी वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावण्यावर बंदी घातली होती. गाडीच्या आतील भागात काय आहे, हे स्पष्टपणे दिसण्यासाठी चारचाकी वाहनांच्या समोरील व मागील बाजूची काच ७0 टक्के तर दोन्ही बाजूच्या काचा ५0 टक्के पारदर्शक असाव्यात, असे मोटार वाहन कायदा सांगतो. कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आरटीओ व वाहतूक पोलिसांना आहेत.