करोना व्हायरसने आज संपूर्ण मानवजातीसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. या धोकादायक विषाणूचा फैलाव रोखणारी लस शोधून काढण्यासाठी आज जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. करोनामुळे फक्त जीवितहानीच होत नाहीय तर जगाचे अर्थचक्र ठप्प झाले आहे. या अशा करोनाला रोखण्यासाठी जगभरात ७० लसींच्या निर्मितीवर काम सुरु आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, लसीच्या मानवी चाचण्यासुद्धा सुरु झाल्या आहेत.

हाँग काँगमधील कॅनसिनो बायोलॉजिसने प्रयोगासाठी एक लस बनवली आहे. बिजींग इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नोलॉजीची लस दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे. मॉडर्ना इन्क आणि इनोव्हिओ या अमेरिकेतील दोन औषध कंपन्याही करोनाचा फैलाव रोखणारी लस बनवण्यावर काम करत आहेत.

आणखी वाचा- GoodNews : करोनाच्या प्रसाराचा वेग मंदावतोय; अभ्यासातून समोर आले दिलासादायक निष्कर्ष

चीनमध्ये बनवण्यात आलेल्या लसीला मानवी चाचणीसाठी मान्यता देण्यात आली आहे. जगभरात प्रचंड वेगान लस निर्मितीचे काम सुरु आहे. एखादी लस बाजारात आणण्यासठी १० ते १५ वर्षांचा कालावधी जातो. पण वर्षभराच्या आत ही लस बाजारात आणण्याचा औषध कंपन्यांचा प्रयत्न आहे. छोटया आणि मोठया दोन्ही प्रकारच्या औषध कंपन्या लवकरात लवकर करोनाला रोखणारी लस शोधून काढण्यावर काम करत आहेत.

आणखी वाचा- करोना व्हायरसवर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन ते जादूई औषध नाही, अमेरिकन संशोधकांचा दावा

कॅनसिनोकडे लस तयार आहे. त्यांना मागच्या महिन्यात लसीच्या मानवी चाचण्या घेण्यासाठी चीनकडून मान्यता मिळाली. अमेरिकेतील मॉडर्ना इन्कने अजून त्यांची लस समोर आणलेली नाही. पण त्यांना मानवी चाचण्यांसाठी मार्च महिन्यातच परवानगी मिळाली आहे. लस बनवल्यानंतर आधी त्याची काही वर्ष प्राण्यांवर चाचणी घ्यावी लागते. पण करोनाचे अभूतपूर्व संकट लक्षात घेता प्राण्यांवर चाचणी घेण्याच्या नियमातून सूट देण्यात आली आहे. इनोव्हिओने मागच्याच आठवडयात मानवी चाचण्या सुरु केल्या आहेत.