करोनाने संपूर्ण जगात हाहाकार केला आहे. दरम्यान जग या संकटातून काहीस सावरत होत तर करोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. चीननंतर आता रशियाच्या राजधानीत देखील लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. रशियामध्ये  गेल्या २४ तासांत ४० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. ही महामारी सुरू झाल्यापासूनची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्याचबरोबर ११५९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुतिन सरकारने मॉस्कोमध्ये ११ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवारपासून (२८ ऑक्टोबर) रशियामधील शाळा, महाविद्यालये, मॉल्स, रेस्टॉरंट आणि बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, रशियाच्या ८५ प्रदेशांमध्ये जेथे परिस्थिती विशेषतः गंभीर आहे, तेथे आधी काम थांबविले जाऊ शकते आणि सुट्ट्या ७ नोव्हेंबरच्या पुढे वाढवल्या जाऊ शकतात. या काळात, बहुतेक सरकारी संस्था आणि खाजगी व्यवसायांना देखील काम थांबवावे लागेल, मुख्य पायाभूत सुविधा आणि काही इतरांना वगळता.

करोनामुळे चीन देखील पुन्हा चर्चेत आला आहे. चीनमध्ये मोठ्या संख्येनं करोना रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे चीनसोबतच संपूर्ण जगाच्या सरकारांनी आणि प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून चीननं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली असून आता तर एका आख्ख्या शहरातच चीननं लॉकडाउन लागू केला आहे.

चीनच्या लँझो शहरामध्ये जवळपास ४० लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे. पण अशा शहरामध्ये मोठ्या संख्येनं करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याचं समोर आल्यानंतर चीननं एक मोठा निर्णय घेतला. या संपूर्ण शहरात चीननं कठोर लॉकडाउन लागू केला. जर फारच आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडण्याचे नागरिकांना आदेश देण्यात आले आहेत.

विमानांचं उड्डाण रद्द, लॉकडाउनचाही निर्णय

करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने Xi’an आणि Lanzhou येथे ६० टक्के विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर मंगोलिया येथील भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने कोळशाच्या आयातीवरही परिणाम होण्याची भीती आहे.